
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, हे प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजलं. यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. मी त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती, असं जलील यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर जलील यांच्या या वक्तव्याला आता आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले गायकवाड?
मी त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती, अशी टिका एमआयएम माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती, जलील यांच्या या टीकेला आता गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही त्या हॉटेलचे कंत्राट घेऊन दाखवा, या वेटरला तर दोनच घुसे मारले आहेत, तुम्हाला एवढा मारेल की तुम्ही हॉटेल चालवायच्या लायकीचे सुद्धा राहणार नाही, असं आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मंगळवारी आमदार निवासमधील कॅन्टीनमध्ये जोरदार राडा झाला होता. शिळे आणि खराब जेवण दिल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.
मी गेल्या साडेपाच वर्षांपासून मुंबईमध्ये येत आहे. मी जेवणासाठी बाहेर जात नाही. मी जेवण मागवलं पण डाळ खराब होती, भातही शिळा होता. मी पहिला घास खाल्ला आणि मला अस्वस्थ झालं. यापूर्वी देखील तीनदा असाच प्रकार घडला होता, त्यावेळी मी कॅन्टीनच्या मालकाला समज दिली होती, असं स्पष्टीकर या संपूर्ण प्रकरणावर संजय गायकवाड यांनी दिलं होतं.
विरोधकांकडून टीका
दरम्यान या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली आहे, त्यांच्या निलंबणाची देखील मागणी करण्यात आली.