चुंबनावरून SIT होते अन् गरीब मुलीवर बोलल्याने खासदारावर गुन्हा, कायदा व सुव्यवस्था कोठ्यावर नाचतेय, संजय राऊत यांचा घणाघात

| Updated on: Mar 21, 2023 | 10:37 AM

Sanjay Raut News | अमृता फडणवीस आणि शीतल म्हात्रे प्रकरणावरून राज्यात एसआयटी स्थापन होते, पण एका गरीब पारधी कुटुंबातील मुलीवरील निर्घृण हल्ल्याप्रकरणी काहीच कारवाई होत नाही, ही राज्याची शोकांतिका असल्याची टीका संजय राऊत यांनी आज केली.

चुंबनावरून SIT होते अन् गरीब मुलीवर बोलल्याने खासदारावर गुन्हा, कायदा व सुव्यवस्था कोठ्यावर नाचतेय, संजय राऊत यांचा घणाघात
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यातली कायदा व सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय. आपल्या कुटुंबातील व्यक्तीवरून एका व्हिडिओ वरून SIT स्थापन होते. एका चुंबन प्रकरणावरून SIT स्थापन होते. तर माग बार्शीतील (Barshi) गरीब मुलीचं जे रक्त सांडलं गेलं, तिच्यावर कोयत्याने निर्घृणपणे हल्ला झाला, त्यावरून काहीच कारवाई होत नाही. त्यावर बोललं तर माझ्यावर, एका खासदारावर, पत्रकारावर गुन्हा दाखल होतो, ही राज्याची शोकांतिका असल्याची गंभीर टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. बार्शी येथील अल्पवयीन मुलीचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले छायाचित्र ट्विट केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावरून राऊत यांनी गृहमंत्री आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला.

इतिहासात कधीच घडलं नव्हतं….

राहुल गांधी यांना होणारा विरोध तसेच राज्यातील शिवसेना पक्षाविरोधातील कारवायांवरून संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना कुणाला तरी विकायची आहे, म्हणून मोठा सौदा केला जातो. निवडणूक आयोगाचा वापर केला जातो. एका फुटलेल्या गटाच्या हातात शिवसेना दिली जाते. हेसुद्धा इतिहासात घडलं नव्हतं. देशातली लोकशाही संपतेय म्हणून असं वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याची संसदेतील मेंबरशिपच रद्द करावी, अशी मागणी देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती.

मालेगावात ऐतिहासिक सभा..

उद्धव ठाकरे यांची २६ मार्च रोजी मालेगावला ऐतिहासिक सभा होणार आहे. त्याची तयारी उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे प्रभारी करत आहेत. अद्वय हिरे त्याचं नेतृत्व करीत आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

शिधा फक्त आमदारांना खोक्यात मिळतो..

गुढीपाडव्यानिमित्ता आनंदाचा शिधा मिळणारा, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र अनेक ठिकाणी त्याचा पुरवठा झालेला नाही. यावरून संजय राऊत यांनी सरकारला फटकारलंय. ते म्हणाले, ‘ दिवाळीचा शिधाही मिळालेला नाही. शिधा हा फक्त आमदारांना खोक्यात मिळतो. गरीबांना मिळत नाही.

मी काय चुकलो?

ज्या मुलीवर कोयत्याचे वार झालेत. जिची आई माझ्याशी बोलली. मुलीला न्याय मिळाला नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी ती सरकारकडे करतेय. तिच्या आईने मरणाची इच्छा व्यक्त केली आहे. पारधी समाजातील ही मुलगी आहे. बार्शीतल्या गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृण हल्ला केला.
मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय मी योग्य माध्यमातून पोहोचवला. त्या मुलीवर झालेल्या इतर अत्याचाराविषयी कोणताही उच्चार केला नाही, त्यात माझं काय चुकलं, असा सवाल राऊत यांनी केला.

चुंबनावरून एसआयटी..

तिचं रक्त वाया जाऊ देऊ नका, यावर बोलल्याने माझ्यावर, एका खासदारावर गुन्हा दाखल होत असेल तर राज्यातला कायदा कोणत्या पद्धतीने काम करतोय, हे तुम्हाला स्पष्ट दिसेल. आपल्या कुटुंबातील व्यक्तीवरून एसआयटी स्थापन केली जाते. एका चुंबनाच्या व्हिडिओवरून एसआयटी स्थापन केली जाते. पण मी रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या एका मुलीचा फोटो ट्विट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. ही या राज्याची कायदा, सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय, हे यावरून स्पष्ट दिसतंय, अशा शब्दात राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले.