Ajit Pawar : अजित पवार गटाचं एक पाऊल मागे का? कुठला हट्ट सोडणार?
Ajit Pawar : आज सकाळी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यात जमा असल्याची सूत्रांची माहिती आहे अशी बातमी आली. घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा अजित पवारांनी प्रस्ताव दिला होता.

“पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये चिन्हामुळं दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी फिस्कटणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारीवर लढायचं असेल तर आम्ही घड्याळाचा हट्ट धरणार नाही” असं म्हणत पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या शहराध्यक्षांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतलाय. ‘इतकच नव्हे तर जागा वाटपावरून आम्ही आघाडीची चर्चा फिस्कटू नये, असा प्रयत्न करतोय’ असं ते म्हणाले. “अजित दादांनी शरद पवार राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत यांना माझ्या प्रभागातून उमेदवारी द्या,असं म्हटलं तर एकवेळ मी लढणार नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणू” असं म्हणत शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, यासाठी सर्वोतोपरी तयारी दर्शवली आहे.
“सकारात्मक चर्चा सुरू आहे. 27 वरून 22 जागांवर शरद पवार गट आलेला आहे. खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्यासोबत चर्चा होणार आहे. यातून सकारात्मक चर्चा होईल. तुषार कामठे काय म्हणतात याविषयी घेणेदेणे नाही. अजित पवार म्हणतील तो अंतिम निर्णय आहे” असं अजित पवार गट शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले. “शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एक-दोन जागांसाठी हट्ट धरू नये. जितेंद्र ननावरे यांच्यावर अन्याय करू शकत नाही. त्याची उमेदवारी निश्चित आहे. माघार घेता येणार नाही. दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत अस कटू निर्णय घेणार नाही. सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी दिल्यास वेळप्रसंगी मी निवडणूक लढणार नाही” असं शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले.
निवडणूक चिन्ह कळीचा मुद्दा
आज सकाळी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यात जमा असल्याची सूत्रांची माहिती आहे अशी बातमी आली. घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा अजित पवारांनी प्रस्ताव दिला होता. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नाही. म्हणजे निवडणूक चिन्हावरुन आघाडी तुटणार असं बोललं जात होतं. काल अजित पवारांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे चर्चा करण्यासाठी गेले होते.
