
मुंबई : विमानात साप, उंदीर वगैरे शिरल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, यावेळी काही वेगळेच घडले आहे. नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात (Air India Flight) एक विंचू (scorpion) तर घुसलाच पण त्याने महिलेला डंखही (stung) केला. त्यामुळे महिलेची प्रकृती ढासळू लागली. विमान मुंबईत पोहोचताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिथे प्राथमिक उपचारानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली व दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. ही घटना 23 एप्रिलची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी महिला काही कामानिमित्त नागपुरात आली होती. एअर इंडियाच्या नागपूर मुंबई फ्लाइटने (AI 630) ते परत येत होती. नियोजित वेळेत ती महिला आपल्या सीटवर बसली आणि फ्लाईटही ठरलेल्या वेळेत टेक ऑफ झाली. विमान आकाशात पोहोचताच अचानक महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. फ्लाइट अटेंडंटने लगेच तिच्याजवळ जाऊन चौकशी केली असता, त्या महिलेला विंचवाने दंश केल्याचे समोर आले. ही बातमी समजताच बाकीचे प्रवासीही घाबरले.
घाईघाईत संपूर्ण विमान तपासण्यात आले, पण विंचू कुठेच सापडला नाही. तर दुसरीकडे महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. अशा परिस्थितीत मुंबई विमानतळावर पोहोचताच महिलेला प्रथम विमानातून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर काही वेळातच महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र डॉक्टरांनी निरीक्षणासाठी तिला रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला.
दुसरीकडे, एअर इंडियाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. या घटनेला दुजोरा देत कंपनीने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. विंचू चावल्याची माहिती मिळताच त्या महिलेसाठी योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले. त्याचवेळी, मुंबईला पोहोचल्यानंतर, रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्यांची टीम महिलेसोबत उपस्थित होती.
याआधी गल्फ इंडियाच्या फ्लाइटमध्ये एक पक्षी कॉकपिटमध्ये घुसला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही घटना घडली होती. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय विमानवाहू कंपनीच्या कालिकत दुबईच्या फ्लाइटमध्ये साप आढळून आला होता.