Eknath Shinde Shivsena : संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी सिक्रेट मीटिंग, शिंदेच्या आमदार,खासदारांनी घेतला मोठा निर्णय

Eknath Shinde Shivsena : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या हिताला प्राधान्य देत आहे. त्यातून भविष्याच्या राजकारणाची बीजं रोवली जाणार आहेत. आता शिंदेंच्या आमदार-खासदारांनी एक निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde Shivsena : संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी सिक्रेट मीटिंग, शिंदेच्या आमदार,खासदारांनी घेतला मोठा निर्णय
Sanjay Shirsat
| Updated on: Nov 15, 2025 | 10:10 AM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत वाद होण्याची शक्यता आहे. कारण बऱ्याच ठिकाणी सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळी भूमिका घेत आहे. सध्या नगरपालिका आणि नगर परिषदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. लवकरच जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणूका लागू शकतात. नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीतील भूमिकेचे जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीवर परिणाम होऊ शकतात. पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाने भाजपला धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिंदे सेनेसह सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत हातमिळवणी केली आहे.

नंदुरबार नगरपालिकेसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला बाजूला ठेवत युती केली. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा असच घडू शकतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या म्हणजे नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी शिवसेना छत्रपती संभाजीनगर कोअर कमिटीची बैठक झाली.

काय निर्णय झाला?

ही बैठक अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. या बैठकीत काही निर्णय झाले. शिवसेना भाजपासमोर युतीचा प्रस्ताव ठेवणार आहे आणि हा युतीचा प्रस्ताव भाजपने मान्य केला नाही तर, शिवसेना स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेणार आहे.

बैठकीला कोण-कोण उपस्थित?

याबैठकीला मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, माजी आमदार किशनचंद तनवाणी, कैलास पाटील, अण्णासाहेब माने पाटील, भाऊसाहेब चिकटगावकर, माजी महापौर विकास जैन, नंदकुमार घोडेले, त्रिंबक तुपे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख विजय वाघचौरे, असे महत्वाचे नेते उपस्थित होते.