Shani Shingnapur Temple : शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांबद्दल मोठा निर्णय

Shani Shingnapur Temple : शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टने त्यांच्याकडे नोकरीला असलेल्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. दररोज दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक इथे येत असतात.

Shani Shingnapur Temple : शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांबद्दल मोठा निर्णय
Shani Shingnapur Temple
| Updated on: Jun 13, 2025 | 2:01 PM

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. शनिशिंगणापूर येथे दररोज दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक येत असतात. श्री क्षेत्र शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये अनेक मुस्लिम कर्मचारी सुद्धा नोकरीला होते. त्यावरुन वाद निर्माण झालेला. शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी नोकरीला होते. त्यांच्याविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे, अन्यथा 14 जून रोजी मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठी रॅली काढली जाईल असा संघटनेने इशारा दिला होता. उद्या 14 जून आहे. मात्र त्याआधीच मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे.

श्री क्षेत्र शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने तिथे काम करणाऱ्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी सध्या कार्यरत होते. अनियमितता आणि शिस्तच पालन न केल्याच्या कारणावरून काढण्यात आल्याचे संस्थेने स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनाचा दबाव होता.

114 मुस्लिम कर्मचाऱ्यांबद्दल ट्रस्टच काय म्हणणं होतं?

शनि देवाच्या चौथऱ्यावर मुस्लिम लोकांच्या हाताने काम करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या बाबत ट्रस्टच म्हणणं होतं की, “मंदिर ट्रस्टमध्ये एकूण 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात. परंतु मंदिर परिसरात एकही मुस्लिम कर्मचारी ड्युटीवर नसतो” “हे मुस्लिम कर्मचारी मंदिर ट्रस्टच्या कृषी विभाग, कचरा व्यवस्थापन विभाग आणि शिक्षण विभागात काम करतात” असं ट्रस्टच म्हणणं होतं. 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांपैकी 99 कर्मचारी मागच्या पाच महिन्यांपासून कामावर येत नाहीयत. या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार थकवलेले आहेत, असं ट्रस्टकडून सांगण्यात आलं होतं.