ही काळ्या दगडावरची पांढरी रेष, नाही देणार ते…रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांना केलं सतर्क
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा भाजपकडे अर्थखात्यासाठी शब्द टाकला आहे. परंतु भाजप अर्थखाते पुन्हा देणार नाही, अशी भविष्यवाणी रोहित पवार यांनी केली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महायुतीत संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. या संघर्षादरम्यान माजी आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा अर्थखाते द्यावे, अशी मागणी केली आहे. महायुतीच्या बैठकीत सुनेत्रा पवार गटाच्या टिंगरेंनी भाजपकडे अर्थखात्याची मागणी केली. त्यामुळे अर्थखात्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडे असलेल्या अर्थखात्यावर आता रोहित पवार यांनीही मोठं भाष्य केलं आहे.
अजितदादांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले. अजितदादांच्या अपघातानंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादीने अर्थखाते मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप नेत्यांसोबत बैठका घेतल्या. परंतु तोडगा निघाला नाही. अजितदादांच्या निधनाला 9 महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार गटाच्या टिंगरे यांनी अर्थखाते पुन्हा पदरात पडावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. टिंगरे यांनी महायुतीच्या बैठकीतच अर्थखात्याची मागणी केली. या मागणीवर रोहित पवारांनी खोचक प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. अजितदादा गेल्यानंतर भाजपने अर्थखाते चोरून घेतलं. भाजपने हावरटासारखं अर्थखाते घेतलं, अद्याप दिलेलं नाही. ते देणार पण नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, ‘सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. तोपर्यंत त्यांना दिवाळी करून देणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर मदत करावी. ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी मदत करत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. पदधवीर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाल्यावर आम्ही ठिकठिकाणी आंदोलन उभं करू. दिवाळी देखील लोकांमध्ये जाऊन करू. लोकांचं मत सरकारला सांगू. सरकार ऐकणार नसेल. तर सरकारला महाग पडल्याशिवाय राहणार नाही’.
‘सरकारने 5 हजारांची अग्रीम मदत दिली आहे. याचा अर्थ सरकार शेतकरी आणि शेतमजुराला गृहीत धरत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था चालवणारे लोक आहेत. यातील छोटे व्यापारी, महिला असतील, त्यांना गृहीत धरलं जात आहे, असे सिद्ध होते. त्यांना वाटतं की, आमदार-खासदार फोडले तर कोणाची गरज लागत नाही. गरीबांना विसरत असाल, तर गरीब तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील रोहित पवारांनी दिला.
