
पुण्यात गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ फलकबाजी. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील त्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड परिसरात ठीक ठिकाणी फलक लावले आहेत. “तो बाप शिक्षक असूनही संस्कार करायला कमी पडला . मुख्यमंत्री महोदय हीच आहे का भाजपाची आणि RSS ची शिकवण आणि संस्कृती?. आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार? की पक्षातील वाचाळवीरांचं रक्षण करणार ?
महाराष्ट्र आपल्या निर्णयाची वाट बघतोय ! गोपीचंद पडळकर सारखा सडकछाप नेता महाराष्ट्रात ना पूर्वी कधी झाला असेल ना पुढे कधी होईल…” अशा आशयाचे फलक सध्या सर्वांचं लक्ष वेधित आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केली.त्यावरुन वातावरण तापलं आहे. अजित पवार यांनी सुद्धा गोपीचंद पडखळकरांचे कान टोचले. “कुठल्याही व्यक्तीने पातळी सोडून बोलू नये.प्रत्येकाने बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे. अरे ला का रे करणं सगळ्यांनाच येतं. सगळ्यांना सगळ्या प्रकारची भाषा येते. ती आपली संस्कृती, परंपरा नाही. ती आपल्या वडिलधाऱ्यांची शिकवण नाही. आपण शिव, शाहू,फुले, आंबेडकरांच नाव घेतो, त्यांनी त्या काळात सांगितलेले विचार यावर कितीतरी पुस्तक आली आहेत. त्यांचा इतिहास आपण वाचतो, सगळ्यांनी या बद्दल निश्चित काही बंधन पाळली पाहिजेत” असं अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“अशा प्रकारच्या विधानांच आम्ही कधीच समर्थन करणार नाही. गोपीचंद पडळकर हे तरूण नेते आहेत. अनेकदा ते बोलताना आपल्या अॅग्रेशनचा काय अर्थ निघेल हे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की, आपण अॅग्रेशन लक्षात घेऊनच बोललं पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “जयंत पाटील यांच्यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी जे स्टेटमेंट केलं, त्या बद्दल मी त्यांच्याशी बोललो. पडळकरांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात शरद पवारांचा फोन आला. पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं, ते योग्य आहे, असं माझ मत नाही. आपण जबाबदारीने बोललं पाहिजे, असा पडळकराना सल्ला दिला” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.