
बीडच्या शिरूरकासार येथील सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे. ढाकणे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि खोक्याला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी आज शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच येथील पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सह अनेक जन सहभागी झाले आहेत. सकाळी 9 वाजता हा आक्रोश मोर्चा निघाला आहे. आरोपीला वाचवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली आहे. या मोर्चात एकूण सहा मागण्या करण्यात आल्या.
या मोर्चात ढाकणे कुटुंबीयही सहभागी झाले होते. यावेळी महेश ढाकणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सतीश भोसलेची एसआयटी चौकशी करा. आम्हाला राहायची भीती वाटते रात्रभर झोप येत नाही. माझ्या वडिलांचे दात पडलेत, माझा पाय फॅक्चर झालाय. त्याने कमीत कमी 200 हरणं मारले आहेत. त्यामुळे त्याची SIT चौकशी व्हायला पाहिजे. त्याला लवकरात लवकर अटक करा. आमच्या जीवाला पुन्हा धोका आहे, असं महेश ढाकणे म्हणाले.
आम्हाला त्याबाबत काही माहिती नाही, पण सतीश भोसले आम्हाला मरण्याच्या अवस्थेत टाकून गेला होता. ज्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला. त्या सगळ्यांना लवकरात लवकर अटक व्हावी. सतीश भोसले खड्डे करून काय काय पुरलं आहे याची चौकशी व्हावी. त्यादिवशी सुद्धा तो हरण मारून स्कार्पियो गाडीतून घेऊन गेला आहे, मी माझ्या डोळ्याने बघितल आहे, असंही महेश म्हणाले.
दिलीप ढाकणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मोर्चात सहभागी झालेल्या सगळ्यांचा मी आभारी आहे, आम्हाला एवढं मारलं याचा आम्हाला कमी दुःख आहे. मला सगळ्यात जास्त दुःख आहे हरिण वन्य प्राणी मारल्याचं. मी त्यांना आडवा गेलो म्हणून मला एवढं मारलं. मानवावर एवढा हल्ला करतात तर मुक्या प्राण्यावर कसा हल्ला करत असतील याचा विचार करा. आमची एकच मागणी आहे या सर्व आरोपींना कडक शासन झालं पाहिजे, असं दिलीप ढाकणे म्हणाले.