KDMC प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व; सर्वाधिक पाच जागांवर शिवसेनेचे उमेदवार
प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक पाच जागा मिळाल्या असल्या, तरी भाजपचे चार आणि मनसेचा एक सभापती निवडून आल्याने केडीएमसीतील महायुतीच्या अंतर्गत जागावाटपाची चर्चा रंगली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक पाच जागा जिंकत वर्चस्व राखलं आहे. भाजपला चार, तर मनसेला एका प्रभाग समितीचे सभापतीपद मिळाले आहे. विशेष म्हणजे, शिवसेना आणि भाजप महायुतीत एकत्र असतानाही सभापतीपदांच्या संख्येत शिवसेना पुढे राहिली आहे. या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेबाहेर ढोल-ताशांच्या गजरात आणि पेढे वाटून जल्लोष केला. दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी जागावाटप आणि उमेदवारी अर्जांबाबत भूमिका स्पष्ट केली, तर महापौर हर्षाली थविल यांनी महायुती एकत्र असल्याचं सांगितलं. मनसेच्या शीतल मंढारी यांचीही ड प्रभाग समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पाच जागांवर विजय मिळवला, तर भाजपला चार आणि मनसेला एका जागेवर सभापतीपद मिळालं. अ प्रभागातून बंदेश जाधव, ब प्रभागातून सुप्रिया भोईर, जे प्रभागातून दर्शना काळे, ग प्रभागातून सूरज मराठे आणि इ प्रभागातून अर्जुन पाटील हे शिवसेनेचे उमेदवार सभापती झाले. भाजपच्या मेघाली खेमा, मंदा पाटील, रवीना म्हात्रे आणि सरोज राय यांनी अनुक्रमे क, फ, ह आणि आय प्रभाग समित्यांमध्ये सभापतीपद मिळवले आहे. तर मनसेच्या शीतल मंढारी ड प्रभाग समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्या.
क, ह, ग आणि इ या प्रभाग समित्यांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडी बिनविरोध झाल्या. ब प्रभागात शिवसेनेच्या सुप्रिया भोईर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्वप्नाली केणे यांचा पराभव केला, तर आय प्रभागात भाजपच्या सरोज राय यांनी यूबीटीच्या निलेश खंबायत यांचा आठ विरुद्ध दोन मतांनी पराभव केला. या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेबाहेर ढोल-ताशांच्या गजरात आणि पेढे वाटून जल्लोष केला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितलं की, शिवसेना-भाजप युतीमध्ये काही प्रभागांत शिवसेनेचं, तर काही ठिकाणी भाजपचं स्पष्ट बहुमत होतं. भाजपने सहा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काही जागांवर झालेल्या तडजोडीमुळे अखेर भाजपचे चार सभापती निवडून आले, असं त्यांनी स्पष्ट केलं. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत प्रिंटिंग मिस्टेक किंवा अन्य चूक झाली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
महापौर हर्षाली थविल यांनीही शिवसेनेचे पाच, भाजपचे चार आणि शिवआघाडीच्या माध्यमातून मनसेचा एक सभापती निवडून आल्याचं सांगितलं. काही जागांवर तडजोड करून निर्णय घेण्यात आले असले, तरी महायुती एकत्र असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख लाडगे आणि भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह नेत्यांनी चर्चा करून निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मनसेचे शहारध्यक्ष हर्षद पाटील यांनी शीतल मंढारी यांच्या निवडीचं स्वागत केले आहे. प्रभाग समितीचं कार्यक्षेत्र मोठं असून पाणीपुरवठ्यासह विविध नागरी समस्यांची दखल घेऊन पुढील वर्षभरात या समस्या कमी करण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
