मोठी बातमी! मंदिराचे छत कोसळल्याने परभणीत खळबळ, 5 ते 6 भाविकांचा मृत्यू

परभणीतून मोठी बातमी समोर आली आहे. यशवाडी येथे हनुमान मंदिर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या सभामंडपाचा पिलर आणि छताचा काही भाग कोसळला आहे.

मोठी बातमी! मंदिराचे छत कोसळल्याने परभणीत खळबळ, 5 ते 6 भाविकांचा मृत्यू
Parbhani temple Accident
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 20, 2026 | 4:52 PM

परभणीतून मोठी बातमी समोर आली आहे. यशवाडी येथे हनुमान मंदिर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या सभामंडपाचा पिलर आणि छताचा काही भाग कोसळला आहे. हनुमान मंदिराच्या सभामंडपाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात 5 ते 6 भाविक जखमी झाले असून अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

5 ते 6 जणांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या छताच्या भागाखाली अडकल्याने 5 ते 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 ते 40 भाविक अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातील काहीजण जखमी झाले आहेत. आज शनिवार असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी असते, आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. त्यात ही घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहाणी झाली आहे.

बचावकार्य सुरू

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. आतापर्यंत या घटनेत 5-6 भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही बचावकार्य सुरू आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासन आणि अधिकारी बचावकार्यात व्यस्त आहेत. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनाला आदेश

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ट्वीट करताना म्हटले की, ‘यशवाडी येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन, आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधून बचावकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

घटनास्थळी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक बचाव पथके दाखल झाली असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कठीण प्रसंगी गावातील सर्व नागरिकांना आवाहन कृपया आपल्या कुटुंबीयांची व नातेवाईकांची तातडीने विचारपूस करा, अफवांपासून दूर राहा आणि प्रशासन व बचाव यंत्रणांना पूर्ण सहकार्य करा. प्रशासनाला जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचे तसेच आवश्यक सर्व मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व नागरिक सुरक्षित राहावेत हीच प्रार्थना.

Follow Us