
मुंबईः राज्यातील कोरोनाचा (Corona) आकडा दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच जाताना दिसत आहे. आज संपूर्ण राज्यात 2956 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आजपर्यंत कोरोनाचे 77,49,276 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर राज्यात आज चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाचा मृत्यूदर (Death) हा 1.86 असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.90 टक्के एवढे झाले असल्याचेही आरोग्य विभागाकडून (Health Department) सांगण्यात आले आहे.
राज्यात आज 2956 नवीन रुग्णांची नोंद झाली असून चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे आजचा राज्यातील कोरोना आकडा हा दुप्पट असून राज्यात बीए5 व्हेरियंटचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण ठाणे शहरात आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
राज्यातील नागरिकांची आज तपासणी करण्यात आली असून आजपर्यंत 8,13,83,115 रुग्णांपैकी 79,15,418 रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून कळविण्यात आले आहे राज्यात बीए 5 व्हेरियंटचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. या पैकी एक रुग्ण 25 वर्षांची महिला आहे तर दुसरा रुग्ण 32 वर्षांचा पुरुष आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या राज्यातील विविध भागात कोरोना बाधित रुग्ण असून सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबई शहरात आहेत. मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा हा 11813 आहे तर आजपर्यंत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा आकडा हा 19575 इतका आहे. सगळ्यात कमी आकडा हा नंदुरबार जिल्ह्यातील असून आज नंदूरबार जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची शून्य नोंद झाली आहे.
मुंबईनंतर ठाणे शहरात सर्वाधिक रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू 11919 इतक्या जणांचा झाला आहे. तर महानगरपालिका क्षेत्रातही ठाणे महानगरपालिका हद्दीत मुंबईनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.