सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजप प्रवेशाची चर्चा; आता स्वत: नेत्याकडूनच मोठा खुलासा, म्हणाले…
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु ही चर्चा संबंधित आमदाराने फेटाळून लावली आहे.

राज्यात पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधारी आमदाराच्या व्यासपीठावर जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आमदारांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरू आहे. नांदेडच्या प्रताप पाटील चिखलीकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे नांदेडमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.
आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, ‘भाजपच्या नांदेड येथील कोर कमिटीच्या बैठकीत माझ्या भाजप प्रवेशावर चर्चा झाल्याचे वृत्त वर्तमानपत्रात आले. मी कुण्या पक्षात जाणार किंवा न जाणार हे माझ्या सहकार्याकडून समोर यायला पाहिजेत. पण दुर्दैवाने त्यांनी त्यांच्या कोअर कमिटीमध्ये चर्चा केल्याच्या बातम्या आल्या. माझ्या सहकार्याचा कोणताही गैरसमज होऊ नये. त्याच्यासाठी मी स्वतः समोर येऊन राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा खुलासा करत आहे. मी त्या पक्षात काम केलेले आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की, मी भाजपमध्ये यावं, तर अनेकांना मी येऊ नये असंही वाटतं. येऊ नये आणि यावं अशा दोन मताच्या लोकांनी या चर्चा केल्या आहेत’.
अर्थखाते राष्ट्रवादीला पुन्हा मिळेल – चिखलीकर
चिखलीकर पुढे म्हणाले, ‘अजित पवारांनी मला सख्ख्या भावासारखे प्रेम दिले. त्यांच्या पश्चात सुनेत्रा वहिनींनी माझ्यावर पूर्ण ताकद आणि विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मी कायम वहिनींच्या नेतृत्वाखालीच काम करत राहीन’. अजितदादांच्या निधनानंतर अर्थखाते अद्याप भाजपकडेच आहे. यावर चिखलीकरण म्हणाले, ‘अर्थखाते पूर्वी राष्ट्रवादीकडे होतं आणि ते राष्ट्रवादीलाच मिळाले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर योग्य तो निर्णय घेतील आणि सुनेत्रा वहिनींना अर्थखाते देतील असा मला विश्वास आहे’. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर चिखलीकर म्हणाले, ‘टायगर श्रॉफ याच्यावरील हल्ल्यात अल्पवयीन मुले सहभागी असल्याची माहिती आहे. मुंबईसारख्या शहरात गँगवॉर होणं, त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांचा निश्चितच छडा लावेल’.
