
Sunita Jamgade News: नागपूर येथील सुनीता जामगाडे या महिलेला काही दिवसांपूर्वी हेरगिरीच्या संशयावरुन पोलिसांनी अटक केली होती. १३ वर्षीय मुलास हॉटेलमध्ये सोडून सुनीताने काश्मीरमधून भारताची सीमा रेषा ओलांडली होती. त्यानंतर ती पाकिस्तानात व्याप्त काश्मीरमध्ये पोहचली. एलओसी पार करुन पाकिस्तानत गेली. पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेची चौकशी एनआयए आणि भारतीय लष्कराचे अधिकारी करणार आहेत. कुणाच्या तरी सहकार्याशिवाय दोन तासांत नियंत्रण रेषा ओलांडणे शक्य नाही. यामुळे सुनीताला कोणी सहकार्य केले, पीओकेमध्ये गेल्यावर ती कोणाला भेटली, सुनीताने भारतासंदर्भात काही माहिती कोणाला दिली का? याची चौकशी आता करण्यात येणार आहे
सुनीता जामगडे हिला अटक केल्यानंतर ती पोलीस कोठडीत होती. तिची पोलीस चौकशी संपल्यानंतर आता एनआयए आणि लष्कराचे अधिकारी तिची चौकशी करणार आहे. चौकशीत सुनीता जामगडे पोलिसांनी सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. ती वारंवार आपला जबाब बदलत असल्याचे सांगितले जात आहे.
भारत पाकिस्तान दरम्यान तणाव असताना सुनीता जामगडे हिने नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये दोन तासात प्रवेश केला होता. सुनीता जामगडे ४ मे रोजी नागपूरवरुन निघाली होती. त्यानंतर भारताच्या नियंत्रण रेषेवर शेवटचे गाव असलेल्या हुंडरमान येथे ती पोहचली होती. त्या ठिकाणी मुलास हॉटेलमध्ये सोडले. एकटीने नियंत्रण रेषेवरुन पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. तब्बल नऊ दिवस तिचा काही थांगपत्ता नव्हता. अखेर २३ मे रोजी पाकिस्तानी रेंजर्सने तिला भारताकडे सोपवले.
अमृतसर ग्रामीण पोलिसांनी सुनीता विरोधात ऑफिशियल सीक्रेट्स एक्टनुसार झिरो एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा नागपूर पोलिसांकडे वर्ग झाला. नागपूर पोलिसांनी तिला अटक करुन चौकशी सुरु केली. सुनीता सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील काही जणांच्या संपर्कात होती. ते व्यक्ती पाकिस्तानी नागरिक होते की आयएसआय एजंट यासंदर्भात चौकशी केली जात आहे.