संतापजनक… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… मंत्र्यांच्या ताटात काजू, बदामाचा खुराक… नांदेडमध्ये कृषी मंत्र्यांची दुष्काळावर बैठक

महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळत असताना, नांदेडमध्ये कृषीमंत्र्यांच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींना चक्क काजू-बादाम देण्यात आले. पीकं वाया गेल्याने शेतकरी नुकसान भरपाईची वाट पाहत असताना, या संतापजनक घटनेने राज्यभरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंत्र्यांच्या या पाहुणचारावर अनेक स्तरातून टीका होत आहे.

संतापजनक... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू... मंत्र्यांच्या ताटात काजू, बदामाचा खुराक... नांदेडमध्ये कृषी मंत्र्यांची दुष्काळावर बैठक
Drought review meeting
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 12:22 PM

हिरा ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहेत. पाऊसच पडला नसल्याने पीकं वाया गेली आहेत. त्यामुळे जगण्याची भ्रांत निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. सरकार कधी दुष्काळ जाहीर करणार आणि कधी आपल्याला नुकसान भरपाई मिळणार याची वाट शेतकरी पाहत आहेत. शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था राज्यभरात असतानाच एक संतापजनक घटना घडली आहे. नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत चक्क मंत्री आणि आमदारांसाठी काजू, बादामाचा खुराक देण्यात आला. काही लोकप्रतिनिधी त्यावर ताव मारत दुष्काळावर चर्चा करत आहेत. या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यभरात संतापाची तीव्र लाट पसरली आहे.

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ही आढावा बैठक सुरु आहे. या बैठकीला राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, पालकमंत्री अतुल सावे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार संजय जाधव, खासदार रामराव वडकुते, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार कल्याण काळे, खासदार अजित गोपछडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, चंद्रकांत नवघरे, बाबुराव पाटील कोहळीकर, सैईद खान, कैलास पाटील, अमर राजूरकर, तुषार राठोड, आनंदाराव पाटील बोंढारकर यांच्यासह अनेक आजी माजी आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे बैठकीला ऑनलाईन उपस्थित आहेत. मात्र, या बैठकीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संजय जाधवांचा ताव

दुष्काळाच्या स्थितीवर चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधींचा जोरदार पाहुणचार करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींना चक्क काजू, बादामाचा खुराक देण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आठ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करताना मंत्री आणि आमदार चक्क काजू बादाम खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात खासदार संजय जाधव बादामावर ताव मारताना दिसत आहेत. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर काजू आणि बादामच्या प्लेट तातडीने हटवण्यात आल्या. मात्र, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत काजू, बादामाचा पाहुणचार देण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अधिकाऱ्यांना डोकं आहे का?

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांना डोकं नाहीये का? असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला या बैठकीला जाता आलं नाही. मात्र आमचे अधिकारी तिथे गेले आहेत. दत्ता भरणे त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. अधिकाऱ्यांवर काही गोष्टींची जबाबदारी असते. कोणत्या विषयावर बैठक सुरू आहे आणि आपण काय करतो हे अधिकाऱ्यांना समजलं पाहिजे, असा सांगतानाच अधिकारी काही गोष्टी करतात आणि बदनाम आम्ही होतो, असा संताप शिरसाट यांनी व्यक्त केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us