Tukaram Mundhe Robbery: तुकाराम मुंडे यांच्या घरावर दरोडा, नाम साधर्म्यामुळे यंत्रणा गडबडल्या, दिव्यात नेमकं घडलं काय?
Diva Tukaram Mundhe House Robbery:ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात पहाटेच्या सुमाराला दरोडा पडला. पण त्यानंतर यंत्रणांसह सर्वांचाच गोंधळ उडाला. नाम साधर्म्यामुळे यंत्रणा गडबडल्या. दिवा शहरातील घटना नेमकी काय आहे?

Diva Tukaram Mundhe House Robbery: ठाण्यातील दिवा शहरात मंगळवारी पहाटे तुकाराम मुंढे यांच्या घरावर दरोडा पडला. ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली. डॅशिंग सनदी अधिकारी आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याच घरी चोरी झाली की काय? असा समज झाला. सोशल मीडियावर ही वार्ता व्हायरल झाली. नाम साधर्म्यामुळे यंत्रणाही गडबडल्या. उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पण पोलिसांच्या माहितीनंतर खरा प्रकार समोर आला. नावामधील साधर्म्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे समोर आले. दरोडा सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या घरी नाही तर उद्योजक तुकाराम मुंढे यांच्या घरावर पडल्याचे स्पष्ट झाले.
नामसाधर्म्यामुळे गोंधळ, सोशल मीडियावर चर्चांना ऊत
दिवा शहरातील आगासनगाव परिसरात स्थानिक उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांचा बंगला आहे. मंगळवारी पहाटे त्यांच्या घरावर दरोडा पडला. पहाटेच्या वेळी चोरट्यांनी बंगल्यात दरोडा घातला. घरातील 2.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 80 हजार रुपये रोख असा ऐवज चोरला. पण IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नावाशी साधर्म्य असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. तर FDA आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या परिसरात राहत असताना आपल्याला माहिती कसं नाही असा प्रश्न अनेकांना पडला. पोलिसांनी तपासाअंती सर्व माहिती समोर आणल्यानंतर मग खरा प्रकार समोर आला.
मुंब्रा पोलिसांची घटनास्थळी धाव
दरोड्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. पण नामसाधर्म्यामुळे यंत्रणाही गडबडून गेली होती. स्थानिक उद्योजक तुकाराम मुंढे यांच्या घरी हा दरोडा पडल्याचे समोर आले. या प्रकरणात घरातील 2.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 80 हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणाची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.