Pradeep Purnekar Death Case: ठाणे हादरलं, ठाकरेंचे विभागप्रमुख पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या, थेट मृत्यू..

Uddhav Thackeray Shivsena Pradeep Purnekar Death Case: ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Pradeep Purnekar Death Case: ठाणे हादरलं, ठाकरेंचे विभागप्रमुख पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या, थेट मृत्यू..
प्रदीप पुर्णेकर मृत्यू प्रकरण
| Updated on: Sep 30, 2026 | 9:00 AM

ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवण्यात आला. मनोरमा नगर परिसरातील रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मास्क घालून आलेल्या आरोपींनी चार राऊंड फायरिंग केली. त्यापैकी दोन गोळ्या पुर्णेकर यांना लागल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबारानंतर हल्लेखोरांकडून धारदार शस्त्रानेही पुर्णेकर यांच्यावर वार करण्यात आला. रात्रीच गंभीर जखमी अवस्थेत पुर्णेकर यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रदीप पुर्णेकर यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. प्रकरणात 5 आरोपींचा समावेश असल्याचे तपासात समोर आले. तर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Loading...

या गोळीबार प्रकरणाचा पहिला सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर स्कुटीवरून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. गुन्हे शाखेने आरोपींच्या शोधासाठी 9 पथकं तैनात केली आहे. तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात येत आहे. प्रकरणात कापूरबावडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, दोन व्यक्ती चेहऱ्याला रुमाल बांधून दुचाकीवरून प्रदीप पुर्णेकर यांच्या कार्यालयाकडे जाताना दिसत आहेत. या गुन्ह्यात निखील यदाव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि एका अनोळखी इसाम संशयित आरोपी आहेत. पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुलाचे गंभीर आरोप

प्रदीप पुर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर याने याप्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी वडिलांना मारण्याची धमकी दिली होती. याविषयीची एक बैठकही झाली, असा आरोप मुलाने केला आहे. वडिलांना न्याय मिळेपर्यंत हटणार नाही. गणपतीपासूनच हे सर्व सुरू होते. त्यासाठी रेकी करण्यात आली होती, असा गंभीर आरोप पुर्णेकर यांचे मोठे बंधू जयनाथ पुर्णेकर यांनी केला आहे. तिघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे जयनाथ पुर्णेकर यांनी सांगितले.

मनोरमा नगर परिसरात कडकडीत बंद

ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील सर्व दुकाने बंद आहेत. तीन प्राथमिक शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत घरी पाठवण्यात येत आहे. या घटनेमुळे या परिसरात दहशत पसरली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us