Eknath Shinde : एकनाथ शिंदे लंडनमध्ये असताना ठाण्यात पक्षाला बसला मोठा धक्का
Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लंडनमध्ये असताना त्यांच्या पक्षाला झटका बसला आहे. एकनाथ शिंदे हे पुरस्कार सोहळ्यासाठी लंडनला गेले आहेत.

शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लंडनमध्ये असताना त्यांच्या पक्षाला धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे हे पुरस्कार सोहळ्यासाठी लंडनला गेले आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ठाणे महापालिकेतील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचं नगरसेवक पद रद्द झालं आहे. आदिवासी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द झालं आहे. सुलेखा चव्हाण या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. चव्हाण यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने शिवसेना शिंदे गटाला हा धक्का मानला जात आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांनी 16 जून 2026 रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे त्यांचं नगरसेविका पद आपोआप संपुष्टात आल्याचं ठाणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेच्या आणखी नऊ नगरसेवकांवरती नगरसेवक पद रद्द होण्याची टांगती तलवार कायम आहे. ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी नऊ नगरसेवकांबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. सुलेखा चव्हाण या ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 अ च्या नगरसेविका होत्या. सुलेखा चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या होत्या.त्यांच्या खालोखाल निवडून आलेला दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार नाहीय. त्यामुळे निवडणूक आयोग आता या जागेबाबत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.
जे ठाकरेंसोबत झालं तसाच धक्का शिंदेंना
ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्याकडे चांगलं संख्याबळ आहे. एकानगरसेविकेचं पद रद्द झाल्याने फार फटका बसणार नाही. पण पक्षाच्या प्रतिमेला मात्र धक्का बसतो. नुकतच मुंबईत महापालिकेत उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन नगरसेविका पद रद्द झालं होतं. आता असाच धक्का एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बसला आहे. विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर मतदारसंघातील त्यांचे विरोधक समाधान सरवणकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विशाखा राऊत या एकनाथ शिंदेंना भेटल्या. मी 20 नगरसेवक फोडून आणते. पण मला यातून वाचवा असं त्यांनी सांगितल्याचा दावा समाधान सरवणकर यांनी केला.
