Sangli News: पहिला कामगार बराच वेळ बाहेर आलाच नाही, त्याला शोधण्यासाठी दोघे गेले अन्… सांगलीत काळीज पिळवटणारी घटना
Septic Tank Cleaning Accident in Sangli: सांगलीत शोषखड्ड्याची सफाई करताना तिघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. एकामागून एक खाली उतरले आणि तिघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे.

सांगली जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शौचालयाच्या शोषखड्ड्याची सफाई करताना गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे एका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या शोषखड्ड्याची सफाई करताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत तुषार कोष्टी, अक्षय बागडे आणि यशवंत शेळके या तिघांचा मृत्यू झाला आहे. शौचालयाच्या शोषखड्ड्याची सफाई करण्यासाठी एकूण पाच कामगार शिरढोण येथील संबंधित हॉटेलमध्ये गेले होते. त्यानुसार कामगारांनी सफाईचे काम सुरू केले होते. यावेळी यशवंत शेळके हे सर्वप्रथम शोषखड्ड्यात उतरले. मात्र बराच वेळ होऊनही ते पुन्हा वर आले नाहीत.
शेळके यांना नेमके काय झाले आहे, हे पाहण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या अन्य कामगारांनी प्रयत्न केला. मात्र बराच वेळ होऊनही शेळके बाहेर न आल्याने त्यांना वाचवण्यासाठी एकामागून एक असे आणखी दोन कामगार शोषखड्ड्यात उतरले. मात्र दुर्दैवाने हे तिघेही कामगार पुन्हा बाहेर आलेच नाहीत. शोषखड्ड्यातील विषारी वायूमुळे किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा श्वास गुदमरला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले. शोषखड्ड्यात अडकलेल्या तिन्ही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे शिरढोण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शौचालयाच्या शोषखड्ड्यांची किंवा बंदिस्त सांडपाणी वाहिन्यांची सफाई करताना विषारी वायू आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कामगारांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
अशा ठिकाणी योग्य सुरक्षा उपकरणे, ऑक्सिजनची उपलब्धता आणि आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. या दुर्घटनेनंतर सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र या दुर्घटनेचे नेमके कारण काय होते, शोषखड्ड्यात कोणता वायू होता आणि सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.