थर्टी फर्स्टची फुल्लटू तयारी, कुठे देवदर्शनासाठी तर कुठे मटण खरेदीसाठी रांगाच रांगा, पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर

new year 2024 | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. एकीकडे काही जण पर्यटन स्थळावर रवाना झाले असताना दुसरीकडे धार्मिक स्थळांवर गर्दी झाली आहे. अयोध्येतील हनुमान गढीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

थर्टी फर्स्टची फुल्लटू तयारी, कुठे देवदर्शनासाठी तर कुठे मटण खरेदीसाठी रांगाच रांगा, पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर
| Updated on: Dec 31, 2023 | 12:44 PM

पुणे, मुंबई, दि. 31 डिसेंबर 2023 | नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अयोध्येत गर्दी झाली आहे. काही जण पर्यंटन स्थळावर जात असताना अनेकांनी देव दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रभू रामचंद्र यांचे जन्मस्थान असलेल्या हनुमान गढीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. २२ जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. मात्र त्या आधी अयोध्येत भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमून गेली आहे. सलग आलेल्या सुट्यांमुळे मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले आहे. संभाव्य गर्दीमुळे रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

लोणवाळ्यात तपासणी सुरु

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातून लोणावळ्यात पर्यटक आले आहे. त्यांच्या वाहनांची तपासणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे. 31 डिसेंबरच्या रात्री अनेक पर्यटक मद्य किंवा नशेचे पदार्थ पर्यटन नगरीत आणू नये यासाठी ही तपासणी मोहीम सुरू आहे. लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात छोटी वाहने दाखल झाली आहेत.

गोव्यात सर्व पोलीस ऑन फील्ड असणार

गोव्यातील सर्व पोलीस ऑन फील्ड असणार आहे. रविवारी गोव्यातील लोकांना पर्यटकांचा त्रास होणार नाही असे मार्ग तयार केलेले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून सर्व बीच आणि परिसरात नजर असणार आहे. गोव्यात टुरिझम पोलीस म्हणून नवीन युनिट सुद्धा असणार आहे. अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

रत्नागिरीत जोरदार तयारी

मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात जय्यत तयारी करण्यात आली आहे. थीम पार्टीचे विशेष आकर्षण असणार आहे. यावेळी डेस्टिनेशन सेलिब्रेशनला देखील अनेकांनी प्राधान्य दिले आहे. हॉटेल व्यवसायिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. कोकणात विविध हॉटेलना आकर्षक लायटिंग करण्यात आली आहे.

कोल्हापुरात मटन खरेदीसाठी गर्दी

कोल्हापूरकरांसाठी थर्टी फर्स्ट आणि रविवार असा दुहेरी योग आला आहे. यामुळे कोल्हापुरात मटन खरेदीसाठी गर्दी झाली आहे. चिकन मटन मार्केटसह फिश मार्केट ही हाउसफुल झाले आहे. आज मटणाचे दर 680 रुपयांवर आहे. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने तांबडा पांढरा रस्यावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहे. नागपूरमध्ये चिकन, मटणच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे. पुण्यात सकाळपासून मटन खरेदीसाठी गर्दी झाली आहे. पुण्यात मटन चिकनच्या दुकानात बाहेर पुणेकरांच्या रांगा लागल्या आहेत.