Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, प्रसिद्ध हॉटेलच्या पदार्थात आढळली अळी; थेट लायसन्स केलं निलंबित

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा दणका सुरूच आहे. शिरूरमध्ये प्रसिद्ध हॉटेलच्या पदार्थात अळी आढळली. त्यानंतर मुंढेंच्या अन्न व औषध विभागाने थेट लायसन्स निलंबित केलं.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, प्रसिद्ध हॉटेलच्या पदार्थात आढळली अळी; थेट लायसन्स केलं निलंबित
tukaram mundhe news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 9:02 AM

पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शिरूमधील बसस्थानकाजवळ असलेल्या हॉटेल विसावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या हॉटेलमधील साबुदाणा वड्यासोबत देण्यात आलेल्या चटणीत अळी आढळल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर ग्राहकाने तक्रार दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने हॉटेलची तपासणी केली. तपासणीत त्रुटी आढळल्यानंतर हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

एक ग्राहक हॉटेल विसावा येथे आला होता. त्याने नाश्त्यासाठी साबुदाणा वडा मागवला. त्याने मागवलेल्या पदार्थाच्या चटणीत अळी आढळली. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकाने हॉटेल व्यवस्थापनाकडे जाब विचारला. परंतु त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यामुळे ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केली. चटणीत अळी आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण हॉटेलची तपासणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी अन्नपदार्थांची हाताळणी केली. त्यांना स्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी हॉटेलला 15 हजारांचा दंड ठोठावला. तसेच तातडीने त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. काही दिवसांनी अधिकाऱ्यांनी पुन्हा किचनची पाहणी केली. त्यावेळी किचनमध्ये झुरळांचा वावर आढळला. त्याचबरोबर स्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी कायम असल्याचे दिसून आले. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं पालन होत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या हॉटेलचा थेट अन्न परवाना तत्काळ निलंबित केला.

मुंढे यांच्या विभागाकडून राज्यात कारवाईचा धडाका 

तत्पूर्वी, राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून अन्न व औषध विभागाची जोरदार कारवाई सुरू आहे. या विभागात तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली, तेव्हापासून या विभागाकडून कारवाईचा जोर वाढला आहे. मुंढे यांच्या विभागाने आतापर्यंत अनेक बड्या हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे. त्यांनी सरकारी आस्थापनामध्ये असलेल्या कॅन्टीनवरही कारवाई केली आहे. त्यांच्या विभागाने अनेक प्रसिद्ध हॉटेलचे लायसन्स निलंबित करत कारवाईचा झटका देखील दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us