
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये जर महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल कौटुंबिक भांडणासारख्या शुल्लक गोष्टी मी विसरुन जाईन असे म्हटले होते. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येतात का? याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरु झाली. आता यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापूरच्या माढ्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. राजवी ऑईल मिलचे भूमीपुजन करुन शिवसेनेच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या य सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच नाशिकमध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहे. सरकार स्थापनेनंतर नाशिकमध्ये पहिल्यांदाच हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
धुळ्याला उष्णतेचा तडाखा
तापमान 43 अंश सेल्सिअसवर
आठवड्याभरापासून 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
वाढलेल्या तापमानामुळे धुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य
नागरिकांचे हाल
मीरा भाईंदर मधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये 11 वर्षांच्या मुलाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे लाईफ गार्डच्या दुर्लक्षामुळे स्वीमिंग पूलमध्ये बुडून 11 वर्षीय मुलाचा झाला मृत्यू…
मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता तुंगा हॉस्पिटल मध्ये घटनेची माहिती घेण्यासाठी दाखल..
प्लॅनेट एरिया महादेव हाईट बी विंग 101 मध्ये राहणाऱ्या ग्रंथ हसमुख मुथा या अकरा वर्षीय मुलाचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
दारणा नदीत मासेमारीसाठी गेलेला तरुण बुडाल्याची घटना घडली आहे, इगतपुरी तालुक्यात ही घटना घडली आहे. आज सकाळी माणिक खांब येथील एक तरुण मासेमारी करण्यासाठी दारणा नदी पात्रात गेला होता, मात्र तो बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली, त्याचा शोध सुरू आहे.
ठाण्यात क्लस्टर विरोधात नागरिकांचंं आंदोलन
म्हाडा वसाहतीत क्लस्टर योजनेला नागिकांचा विरोध
क्लस्टर योजना कुणासाठी राबवत आहात? नागरिकांचा सवाल
क्लस्टर योजनेला विरोध असल्याचं नागरिकांचं म्हणणं
क्लस्टर योजनेच्या विरोधात म्हाडा वसाहतीतील नागरिक रस्त्यावर
मुंबईतील वांद्रे ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या ऋुषीकेश याने पटकावला वर्ष २०२३ – २४ साठीचा महाराष्ट्र शासनाचा मानाचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावला आहे.
काल परभणी शहरातील इक्बाल नगर भागात काल दोन गटात दगडफेकीची घटना घडली होती.या प्रकरणात पोलिस प्रशासनाकडून अटकेची कारवाई सुरू झाली आहे.
“दोन दिवसांपूर्वी मी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राजगड, मुळशी आणि भोरमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. तुम्हाला डावललं जातंय असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या पक्षात जावं लागेल असं कार्यकत्याचं म्हणणं आहे. भाजपमध्ये जावं अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. येत्या 22 तारखेला पक्षप्रवेश होईल. फडणवीस, बावनकुळे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होईल,” अशी माहिती संग्राम थोपटेंनी दिली.
ठाण्यात क्लस्टरविरोधात नागरिकांनी आंदोलन केलं. म्हाडा वसाहतीत क्लस्टर योजना आल्याने नागरिकांचा क्लस्टर योजनेला विरोध आहे. क्लस्टर योजना कुणासाठी राबवत आहेत असा म्हाडा रहिवाशांनी सवाल केला. क्लस्टर योजनेला विरोध असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
चंद्रपूरचा पारा ४४ अंशाच्या पार गेला आहे. यासोबतच हवामान विभागाने उष्णतच्या लाटेच्या इशारा दिला असून मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. दुपारी बारा ते चार च्या दरम्यान रस्ते निर्मनुष्य झाले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने ठिकठिकाणी सूचना फलक देखील लावले आहेत. पुढील काही दिवस उच्च तापमानाचे असणार असून जिल्हा प्रशासनाने स्वतःची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मनीषा माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती.
“मला काँग्रेसमधून कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपमध्ये आपल्याला न्याय मिळेल अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. मी भाजपने जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पक्षप्रवेशाबाबत मंगळवारी भूमिका जाहीर करेन,” माजी आमदार संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केलं.
येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात भव्य हापूस आंबा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. शिवसेना खासदार रवींद्र वायकर दिल्लीत दोन दिवसीय महाराष्ट्राचा हापूस आंबा महोत्सवाचं आयोजन करणार आहेत. नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा हापूस आंबा महोत्सव 30 एप्रिल आणि 1 मे 2025 असं दोन दिवसीय होणार आहे.
नागपूरमध्ये सर्वाधिक 44.7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भात पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे, उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे सिग्नलही दुपारी 1 ते 4 बंद ठेवण्यात येणार आहे. तर वर्ध्यात उष्मघातानं दीड हजार पक्षांचा मृत्यू झाला आहे. तर बऱ्याच गावांमध्ये पाणीप्रश्नही निर्माण झाला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे .राज्यभरात एकूण 1221 मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल… पोलीस आरोपी मनीषा माने हिला सोलापूर न्यायालयात घेऊन जात आहेत… वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल… आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय… रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक ही केली…
गंभीर बाब म्हणजे सहा वर्षात चौगाव गावातील चार ते पाच जणांचा दोन्ही किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती… वेळीच प्रशासनाने लक्ष दिले नाही तर, संपूर्ण गाव किडनीच्या विकाराचा बळी ठरण्याची व्यक्त होतेय भिती… एका घरामागे आबाळ, वृध्द महिलांसह तरुण मुतखड्यासह वेगवेगळया किडनीच्या आजारांनी त्रस्त… एकापाठोपाठ अनेकांना किडनीच्या त्रास होत असल्याने गावात चिंतेचे वातावरण… गावातील पिण्याचे पाणी खराब असल्या कारणाने किडनीच्या विकारांची लागण झाल्याचे डॉक्टरांकडून निदान झाल्याचे ग्रामस्थ रुग्णांचे स्पष्टीकरण…
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलंय.. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधल्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत… भोरमधील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील सांस्कृतिक भवन हॉलमध्ये मेळावा हा मेळावा पार पडणार आहे. संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणारं असल्याचं निश्चित झालंय…. 3 दिवसांपूर्वीचं थोपटे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे..
हिंदी सक्तीकरणाविरोधात मनसे रस्त्यावर उतरलेली असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याविषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी याप्रकरणात भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणात उशीरा का असेना गुन्हा दाखल झाल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. मी स्वतः आणि प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात धाव घेतलेलीच आहे. जबाबदार असतील त्यांना सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी स्टेटमेंट केलं होतं त्यानंतर माझा फार विश्वास होता. मुख्यमंत्र्यांचा सरकारचं जे वर्तन पाहतोय त्यात कुठेतरी मिस मॅच वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज-उद्धव एकत्र आल्यास शिवसेनेची शक्ती वाढेल असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. दोन कार्यकर्ते आम्हाला मिळाले तर शक्ती वाढल्यासारखं वाटतं हे तर लीडर आहेत. एखादा पडलेला आमदार सुद्धा आम्ही आमच्यात आला तर शक्ती वाढेल म्हणतो हे तर लीडर आहेत, असे भुजबळ म्हणाले.
मराठी शिवाय पर्याय नाही मराठी शिकलेच पाहिजे मुलांनी सगळ्या भाषा लक्ष केंद्रित केलं. मुलांचा भाषा शिकण्यात जास्त वेळ जाईल. पाचवीपासून भाषा आहेत. थोडसं सबुरीनं घेतलं पाहिजे, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सल्ला दिला आहे.
पर्यटनासाठी असलेल्या समुद्रातील स्पीड बोटच्या दुर्घटना घडत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र पालघर मध्ये स्पीड बोट चालकांकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ . समुद्रात जाताना बोट चालकांकडून पर्यटकांना लाईफ जॅकेट ( जीवन रक्षक जॅकेट ) दिले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबईतील गिरगावात मनसे कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहे. दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहे. या बॅनरची चर्चा रंगली आहे.
नांदेडमध्ये सध्या काकडी 80 ते शंभर 100 किलो इतक्या दराने विक्री होत असल्याने काकडी उत्पादकाला चांगला फायदा मिळत आहे. नांदेडच्या सुजलेगाव येथील हाणमंत तांदळे या शेतकऱ्यांने वीस गुंठे क्षेत्रात काकडीच्या वेलाची लागवड केली होती. त्यातून आता दररोज 90 किलो काकडी विक्रीसाठी निघत आहे. त्यातून या शेतकऱ्याने चांगले आर्थिक उत्पन्न होत असल्याने समाधान व्यक्त केले.
नाशिकमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. परंतु हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला. नाशिकमध्ये येण्यासाठी अजित पवार महालक्ष्मीला पोहचले होते. पण जुहू वरून हेलिकॉप्टर आले नाही, तांत्रिक बिघाड झाला असल्याने हेलिकॉप्टर आले नाही, असे समीर भुजबळ यांनी सांगितले.
नागपूर शहर देशातील सर्वात ‘हॉट सिटी’ ठरले आहे. नागपूरचे तापमान ४४.७ अंश सेल्सिअसवर पोहचले. याआधी शुक्रवारीच ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नागपूरमध्ये झाली होती. परंतु शनिवारी यंदाच्या हंगामातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. सविस्तर वाचा
एकत्र येण्यासाठीचा निर्णय शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे घेतील. त्यात इतर कोणताही नेता नसेल. हे दोनच नेते निर्णय घेतली, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्रद्रोही कोण? हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. परंतु काही लोकांना ते कळत नाही. महाराष्ट्र हितासाठी प्रत्येक पाऊल टाकले गेले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट ठेवली नाही. त्यांनी फक्त महाराष्ट्र हित पाहिले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यात अटी शर्ती नाही. ठाकरे बंधू यांनी एकत्र यावे, असे महाराष्ट्रातील काही लोकांना वाटत नाही. मतभेद दूर ठेऊन एकत्र येत असतील आम्ही त्याचे स्वागत करु, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भोर शहरात विविध ठिकाणी संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. दादा म्हणतील ते धोरण आणि दादा बांधतील ते तोरण. आम्ही सदैव संग्राम दादासोबत, या आशयाचे बॅनर भोर शहरात लावण्यात आले आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाण्यातील पडवळ नगर परिसरात एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या बॅनरवर उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा खांद्यावर हात टाकलेला भावनिक फोटो आहे. “महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र!” असा संदेश या बॅनरवर देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात हा बॅनर लागल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सामान्य जनतेने येणाऱ्या काळात दोन्ही भावांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे, अशी भावना व्यक्त केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठी माणूस, महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या हितासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसावे. सध्या हिंदी भाषेची दादागिरी सुरू आहे, अशा अनेक विषयांवर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे संदीप देशपांडे म्हणाले.
निवडणुका हा सामान्य लोकांसाठी एक छोटा विषय आहे, परंतु मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे हित हाच सर्वात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे सर्व मराठी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने सध्या दादागिरी चालू आहे, आणि जसा भाजप हिंदुत्वाचे प्रमाणपत्र वाटत सुटला आहे, त्यांनी हे प्रमाणपत्र वाटू नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे, असेही संदीप देशपांडेंनी म्हटले.
शनिवारी नागपूर शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले असून तिथे सर्वाधिक ४४.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. या तापमानामुळे नागपूरमध्ये या हंगामातील सर्वात उष्ण दिवसाचा अनुभव आला. याआधी शुक्रवारी शहरात ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. देशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट कायम असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, दिल्लीत आज वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गडचिरोलीतील पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खून करून पसार झालेल्या एकाला शिवाजीनगर पोलिसांनी नरवीर तानाजीवाडी परिसरात पकडले. विशाल ईश्वर वाळके (वय ४०, रा. सुयोगनगर, नवेगाव, गडचिरोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कल्पना केशव उंदिरवाडे (वय ६४, रा़ कल्पना विहार, सुयोगनगर, नवेगाव, जि. गडचिरोली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक मोहन काशीनाथ सोनकुसरे (वय ५७, रा. इंदिरानगर, लांझेडा, जि. गडचिरोली) यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पुणे : नागरिकांच्या सोयीसाठी खासदार निधीतून दोन कोटी रुपये खर्च करून शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या अत्याधुनिक शौचालयांवर (ई-टॉयलेट) पुन्हा खर्च करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ई टॉयलेटची पुन्हा तोडफोड होऊ नये, तसेच त्यातील साहित्याची चोरी होऊ नये, यासाठी त्यांच्या जागादेखील बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.