
राज्यात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. पुण्यात शंकर महाराज मठ परिसरात ट्रकचा अपघात झाला आहे. BRT मार्गात ट्रक डिव्हायडर वर चढाल्यामुळे अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे सेराज परिसराचा संपर्क तुटला आहे. सेराज प्रशासनाने हवाई दलाची मदत मागितली आहे. मंडीमध्ये आणखी 4 मृतदेह सापडले आहेत. मंडीमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गडचिरोलीतील नक्षलवाद जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. आमच्या गृहमंत्र्यांनी 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि आम्ही त्या मार्गावर आहोत. नक्षलवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आम्ही महाराष्ट्रात नक्षलवाद संपवू. जिथे जिथे नक्षलवाद होता तिथे तिथे विकास होत आहे. नक्षलवाद संपवून आम्ही विकासाला चालना देत आहोत.
आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये आप सदस्यता मोहीम सुरू केली आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ही मोहीम सुरू केली आहे. सदस्यता घेण्यासाठी आपने 9512040404 हा मोबाईल क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकावर कॉल करून तुम्ही आप गुजरातचे सदस्य बनू शकता.
गोवा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ज्या विधवा महिलांची मुले 21 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत त्यांना दरमहा 4000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
संसदेत पिवळा गॅस सोडणाऱ्या 2 आरोपींना कोर्टाने अखेर सशर्त जामीन दिला असून आठवड्यातून ३ दिवस पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यास सांगितले आहे. १३ डिसेंबर २०२३ नीलम आझाद आणि महेश कुमावत यांनी संसदेत घुसून सभागृहात पिवळा गॅस सोडला आणि घोषणाबाजी केली होती.
विद्यादीप बालसुधारगृहाबाहेर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. या बालसुधारगृहातुन दोन दिवसांपूर्वी 9 मुली पळून गेला होत्या, त्यांना नंतर पोलिसांनी ताब्यातही घेतले.परंतु या बालसुधारगृहात मुलीवर अन्याय होत असल्याने या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
दौंड महिला वारकरी अत्याचारप्रकरणातील आरोपींचे स्केच जारी केले आहेत. सोमवारी रात्री महिला वारकऱ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता.
चिपळूणमधील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात मनसेची धडक दिली असून अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
यवतमाळमध्ये शिवसेना महिला आघाडी अयोध्या पोळ यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. अयोध्या पोळ यांच्या विरोधात अवधुतवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चपलेने मारण्याची भाषा करणार तर आम्ही सुद्धा चपलेची भाषा करू आणि चपलेने मारू. तसेच यापुढे असे गलिच्छ आरोप केले तर जागा दाखवून देऊ, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या महिला आघाडीने घेतली आहे. तसेच पोळ विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही महिला आङाडीडून करण्यात आली.
गडचिरोलीतील नक्षलवाद जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. आमच्या गृहमंत्र्यांनी 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. आम्ही त्या मार्गावर आहोत. नक्षलवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आम्ही महाराष्ट्रात नक्षलवाद संपवू. जिथे जिथे नक्षलवाद होता तिथे विकास होत आहे. आम्ही नक्षलवाद संपवून विकासाला चालना देत आहोत”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील मोलगी गावातील विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास सुरूच आहे. मालवाहू ट्रक मधून आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. वाहनातून चक्क चाळीस विद्यार्थ्यांना आणलं जात आहे. सुरक्षेच्या कुठल्याही उपाय योजना न करता आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जात असल्याचा प्रकार सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात येणाऱ्या नायडोंगरी आदिवासी आश्रम शाळेतील हा प्रकार आहे. त्यामुळे आदिवासी विकास मंत्री या गोष्टीची गंभीर दाखल घेतील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नाशिकच्या निफाड येथील दोन महिन्यापूर्वी बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती… प्राथमिक आरोग्य केंद्र समोरच उघड्यावर अनेक जण जातात शौचाल …
नाशिकच्या निफाड तालुक्यातील पालखेड मिर्ची येथील प्रकार…
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी पावर प्लांटमधून गोंदिया मार्गे आमगावला राख वाहून नेणाऱ्या टिप्परचा मुंडीपार एमआयडीसी येथील बस स्टॉपवर अपघात होऊन चालकाचा या अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. अदानी पावर प्लांट या ठिकाणाहून राख भरून टिप्पर गोंदियाच्या दिशेने निघाला होता. दरम्यान मुंडीपार या ठिकाणी टिप्पर अनियंत्रित झाल्याने एका दुकानात शिरला. यात चालकाचा मृत्यू झाला तर सुदैवाने इतर कुणालाही दुखापत झाली नाही. अलीम शेख असे मृत टिप्पर चालकाचे नाव आहे. घटनेची नोंद गंगाझरी पोलिसांनी घेतली आहे…
बोरगाव, माळशिरस
वारकऱ्यांच्या भक्तीवारीसोबत स्वच्छतेची निर्मल वारी सुरू…
निर्मल वारी मुळे वारीतील स्वच्छता वाढली…
गेल्या दहा वर्षांपासून निर्मल वारी सुरू आहे…
गोरेगाव आरे कॉलनीत बांधलेल्या बेकायदेशीर स्टुडिओबाबत किरीट सोमय्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तात्पुरता स्टुडिओ बांधण्याची परवानगी घेऊन कायमस्वरूपी स्टुडिओ बांधल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या वन विभाग, बीएमसी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह आरे कॉलनीत बांधलेल्या बेकायदेशीर स्टुडिओची तपासणी करत आहेत.
धाराशिवच्या वाशी येथे गेली सात दिवसापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पवनचक्कीच्या विरोधात शेतकऱ्याचे आमरण उपोषण आंदोलन आहे. आज उपोषणाचा आठवा दिवस, उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली असली तरीसुद्धा शेतकऱ्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. पवनचक्की कंपनीकडून संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी हे आमरण उपोषण
सुरु आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईवरून उद्धव ठाकरेंवर निशाना साधला होता. त्यावरून पलटवार करत आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदीं-शाहांचा दबाव असल्याचं राऊत म्हणाले.
“वाल्मिक कराड विकृत बनला होता. मी लोकांना वाल्मिक पासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मी वाल्मिकचं ऐकलं नाही म्हणून वाल्मिकने माझ्या आई-वडिलांवर खोटे गुन्हे दाखल केले. वाल्मिक कराडच्या मागे एक अदृश्य शक्ती होती. वाल्मिकने अनेक लोकांचं आर्थिक शोषण केलेलं आहे” असं विजयसिंह बांगर म्हणाले.
“मला सांगायचे की तुम्ही राजकारणामध्ये मुलापर्यंत जाऊ नका, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. दोन्ही भाऊ एकत्र येत असल्यामुळे विरोधकांची पोटदुखी सुरू झाली आहे. पाच तारखेला मुंबई येथे होणाऱ्या विजय सभेची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातून असंख्य लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत” असं प्रकाश महाजन म्हणाले.
नालासोपारा बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान यांच्या आत्महत्या प्रकरणात दोन पोलीस आणि एका दलालावर गुन्हे दाखल. श्याम शिंदे, राजेश महाजन असे पोलिसांचे नाव आहे तर लाजपत लाला असे दलालाचे नाव आहे. काल मंगळवारी बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात या पोलिसांची नाव लिहिली होती.
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा मुंबईत हजेरी लावली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, अधूनमधून हलक्या सरींची रिपरिप सुरु आहे. पुढील तीन तासात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पिंपरी- चिंचवड मध्ये पीएमपीएल बस वर झाड कोसळलं. आज सकाळी दहाच्या सुमारास निगडीच्या दिशेने निघालेल्या बसवर अचानक झाड कोसळलं, त्यावेळी बसमध्ये 70 प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहनी झालेली नाही.
या रस्त्याच्या शेजारी केबल टाकण्याचं काम सुरू आहे, यासाठी झाडाच्या भोवताली खोदण्यात आलं होतं. झाडांची मुळं सैल झाल्यामुळे झाड रस्त्यावर धावणाऱ्या बसवर थेट कोसळलं.
बस ट्रान्सपोर्ट असोसिएशच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार आहे. बस चालकांच्या मागण्यांसंदर्भात आजच्या बैठकीत तोडगा निघणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील खासगी बस मालकांचा आज होणारा संप मागे घेण्यात आला आहे. आज होणारं स्कूल बस मालकांचं आंदोलनही पुढे ढकलण्यात आलं आहे.
5 जुलैच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना गट, मनसे नेत्यांनी वरळीत डोमची पाहणी केली, पूर्वतयारीचा आढावा घेतला. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल परब यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
दौंड येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात पुण्यात महिला संघटना गुलाबो गॅंग तर्फे अलका टॉकीज चौक येथे आंदोलन करण्यात आलं.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एका 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता . वारी दरम्यान या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असून सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप गुलाबो गँग या संघटनेने केला आहे. “महिला आयोग झोपले काय? महाराष्ट्राच्या मुली सुरक्षित नाय” अशा घोषणाबाजी करत अलका टॉकीज चौक येथे आंदोलन करण्यात आलं तसेच प्रतीकात्मक पुतळ्याचे हात आणि पाय तोडत महिलांकडून निषेध नोंदवण्यात आला.
महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस ‘मराठी’ बोलताना पहायचा आहे ? मग ही सुरुवात आहे ! असं लिहीलेली 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. राज व उद्धव ठाकरे हे दोघेही या मेळाव्यास एकत्र उपस्थित राहणार आहेत.
मनसेकडून पुण्यात अंतर्गत सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेल्यास मनसेला किती फायदा होणार, हे या सर्वेक्षणातून स्पष्ट होणार आणि त्यानंतरच युतीचा निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्या पक्षासोबत युती केल्यास फायदा होऊ शकतो की स्वबळावर लढायचं याबद्दलचं हे सर्वेक्षण आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत मनसे स्वतंत्र सर्वेक्षण करणार आहे. सर्वेक्षणाचा अहवाल दोन आठवड्यात मुंबईला पाठवला जाणार आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना मतदान करण्यासाठी अजित पवारांनी 20 हजार ते 1 लाख रुपये वाटल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. याचे पुरावे आमच्याकडे असून योग्य वेळी आम्ही ते समोर आणू, असं ते म्हणाले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी नाही तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी जिंकली, अशीही टीका हाकेंनी केली.
“संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला महत्त्वाचं पद मिळालं. पाकिस्तानी आर्मी चीफला व्हाइट हाऊसमध्ये पार्टीला बोलावलं. अनेक राष्ट्र पाकिस्तानसोबत ऑपरेशन सिंदूरनतंर उभी राहिली. अजूनपर्यंत भारताचं परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय त्यावर एक शब्द बोलत नाहीय. मोदींनी ट्रम्प यांना विचारलं पाहिजे, भारतासोबत हे काय चाललय? ही खूप गंभीर बाब आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पाकिस्तानला इतकं महत्त्व, ताकद कधी मिळाली नाही. भारताच्या परराष्ट्र धोरणाला यूएनमध्ये महत्त्व मिळायचं. पाकिस्तान टेरिरिस्ट देश आहे हे आपण सांगण्यात यशस्वी ठरलो. पाकिस्तान दहशतवादाचा पालनकर्ता आहे हे पटवून दिलं. पण मोदी आल्यापासून, जयशंकर आले, अमित शाह तेव्हापासून आपण हे सिद्ध करु शकलेलो नाही असं दावा संजय राऊत यांनी केला.
5 जुलैचा मेळावा काही राजकीय नाही. काल रात्री माझं राज आणि उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. विजयी मेळाव्यासाठी दोन्ही बाजूंनी तयारी सुरू आहे. आज आमचे आणि मनसे नेते वरळी डोमची पाहणी करतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली. देवेंद्रजी, महाराष्ट्राची लुटमार थांबवा असं पत्र संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलंय.
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच्या बीड जिल्हा कारागृहातील संशयास्पद हालचालींमुळे त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कराडच्या जीवितास धोका असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांसह संतोष देशमुख कुटुंबियांनी आरोपी वाल्मीक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहाऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावं, अशी मागणी केली होती. आज धनंजय देशमुख यांनीही या प्रकरणी टोकाची भूमिका घेण्याचा इशारा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या जिल्हा कारागृहात काही दिवसांपूर्वी गिते गँग आणि कराड गँगमध्ये वाद झाला होता, ज्यामुळे कारागृहात तणावाचे वातावरण होते.
संत तुकाराम महाराज पालखी रथाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पालखी रथ माळीनगरमध्ये दाखल झाले आहे. पालखी रथाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज बोरगावमध्ये मुक्काम असणार आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण तापले आहे. आता बच्चू कडू समर्थक संचालक आनंद काळे यांना विभागीय सहनिबंधकांनी अपात्रतेची नोटीस बजावली आहे. त्यांना १४ जुलैपर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात बच्चू कडू यांनाही अशाच प्रकारची अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. संचालक आनंद काळे यांच्यावर असा आरोप आहे की, बँकेच्या सभेत २ लाख २८ हजार ३२८ रुपयांचा खर्च नामंजूर केलेला असतानाही त्यांनी हे बिल काढून बँकेचे पैसे वापरले. हा खर्च नामंजूर करून रक्कम बँकेत जमा करण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले होते. याच ठपक्यावरून विभागीय सहनिबंधकांनी त्यांना सहकार कायद्याच्या कलम ७८ नुसार अपात्र का घोषित करू नये, अशी नोटीस बजावली आहे. आता आनंद काळे या नोटीसला काय खुलासा देतात, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
अर्धा एक तासाच्या पावसात रस्त्यावर साचले पावसाचे पाणी… शहरातील रस्त्यांवरून वाहत होते पाणी… पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरले… नाशिक शहर परिसरात देखील सकाळी लावली होती पावसाने हजेरी.. पावसाचा जोर वाढला तर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार… गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता
सकाळी पासून ढगाळ वातावरण… कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट… पुणे, पिंपरी – चिंचवड ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढणार असून या भागाला येलो अलर्ट देण्यात आलाय… तर घाटमाथ्यावर मुसळधार्त्यावरती मुसळधार पाऊस होणार असून या भागाला ऑरेंज ऑलिर्ट देण्यात आला आहे.
पुरवठा विभागाने अवैधपणे खरेदी केलेल्या रेशनच्या तांदुळाच्या गोदामावर धाड टाकून 180 कट्टे केले जप्त.. अभिजीत इंगोले, लोकेश अग्रवाल आणि दर्शन अग्रवाल या तीन जणांवर गुन्हा दाखल…. मागील काही महिन्यांपासून आरोपी अवैधपणे खरेदी करत होते रेशनचा तांदूळ… अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू आहे रेशनवरील तांदुळाचा खरेदीचा काळाबाजार..
धाराशिव : भावाचे नाव गुन्ह्यातून कमी करून देतो असे म्हणत मागितली 4 लाख रुपयांची लाच… धाराशिवच्या शहर पोलीस स्टेशन परिसरात एसीबीने टाकला ट्रॅप… मोबीन नवाज शेख याच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल… सुरुवातीला ५ लाखांची मागणी करत तडजोडीअंती ४ लाख रुपये घेण्याचे झाले होते निश्चित