
महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत. सध्या पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकारणाला नवीन चैतन्य मिळले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला कडाडून विरोध केला. यानंतर राज्य सरकारकडून हा जीआर रद्द करण्यात आला. यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येत विजयी मेळावा साजरा केला. या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी राज्यातील विविध मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच वारकऱ्यांचा उत्साहदेखील पाहायला मिळत आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
कर्जत शहरातील उल्हास नदीवर उभारण्यात आलेल्या 52 फूट उंचीच्या श्री विठ्ठल मूर्तीची आज पूजा करण्यात आली. प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात भाविकांनी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली. तसेच मंदीरात पारंपरिक वेशभूषेत भारुड आणि अभंग सादर केलं. त्यामुळे या परिसराला वेगळं चैतन्य प्राप्त झालं.
संतोष देशमुख प्रकरणात सोमवारी 7 जुलै रोजी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. वाल्मीक कराडच्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्याने निर्णय दिला जाणार आहे. तसेच चार्ज फ्रेम देखील होण्याची शक्यता आहे. या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. तसेच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख सुनावणीसाठी उपस्थित असणार आहेत.
युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे आषाढी एकादशी निमित्त वरळीत जाणार आहेत. आदित्य ठाकरे वरळीच्या सासमिरा मार्गावरील विठ्ठल मंदिरात दर्शन घेणार आहेत.आदित्य ठाकरे थोड्याच वेळात मंदिरात पोहचणार आहेत.
वसई, विरारला पावसानं झोडपलं, मुसळधार पाऊस
पावसामुळे सायंकाळी घरी जाणाऱ्या चक्रमान्यांचे मोठे हाल
सकल भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारक, रस्त्यावरील नागरिकांना त्रास
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ
दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर रामकुंडातील पाणी वाढले
गंगापूर धरणातून पाच हजार 186 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
भिवंडीत दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात
मुसळधार पावसामुळे शहरातील तीनबत्ती बाजारपेठेत भरलं पाणी
छोट्या-मोठ्या दुकानात पाणी शिरण्यास सुरुवात
पावसाचा जोर कायम राहिल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यता
आषाढी एकादशी निमित्त मालेगावरोडवरील विठ्ठल मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. पहाटे चार वाजल्यापासून भक्त दर्शनासाठी येत आहेत. सकाळी या मंदिरात महापूजा संपन्न झाली, आताही मोठ्या संख्येने भावी विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे.
मुंबई उपनगरात पावसाला सुरूवात झाली आहे. बोरिवली मागाठाणे परिसरात पाऊस सुरु आहे. हवामान विभागानेही आज पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शहरात पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.
बीड शहरातील शनिवार पेठ, काळा हनुमान ठाणा परिसरातील रहिवासी रामा दिलीपराव फटाले वय-42 वर्ष यांनी कापड व्यवसासाठी सावकाराकडून पैसे घेतले होते. पैसे वेळेवर परत करता न आल्याने सावकाराने त्रास द्यायला सुरुवात केली. सावकाराच्या त्रासाला कंटाळून घरातच गळफास घेऊन जीवन संपवले.
जालन्यातली बदनापूर शहरातल्या साई मॉर्डन इंग्लिश स्कूल मधील शाळकरी विद्यार्थ्यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली. शाळेतल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारत गळ्यात टाळ आणि हातात मृदुंग घेऊन विठू नामाचा गजर करत दिंडी काढली.
भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांना पहलगाम आठवायला लागलं आहे, तुम्ही पाकिस्तानात जाऊन शंभर अतिरेकी मारल्याचं छाती ठोकून सांगत आहेत. मात्र पहलगामचे चार आतंकवादी अजून सापडलेले नाही, पुलवामा मध्ये अडीचशे किलो आरडीएक्स आलं, तुम्ही लोकांना वारंवार मूर्ख बनवू शकत नाही, त्यामुळे यांची भीती साहजिक आहे, दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांची पंचायत झाली आहे म्हणून ते असं वक्तव्य करत आहे, असा खरमरीत टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
दिनेश लाल यादव निरहुआ भोजपुरी कलाकार असला तरी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भरोशावर मोठा झाला आहे, एखाद्या भाषेचा असा आव्हान करणं म्हणजे त्या खासदाराच्या बुध्दीची दिवाळखोरी आहे, तू महाराष्ट्रात येऊन उभा रहा म्हणजे कळेल तुला तुझी भोजपुरी कुठे आहे? असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला फटकारले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जमला विठ्ठल भक्तांचा मेळा जमला आहे. भाविक भक्तांची अलोट गर्दी दिसून येत आहे. आषाढीनिमित्त चंद्रभागेच्या तिरावर स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमा झाली आहे.
अनाजी पंत म्हणजे काय, असा सवाल करत आमच्याकडे पण नाव आहेत. पण आम्ही महाराष्ट्र धर्म मानतो, असे आशिष शेलार म्हणाले. त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. दोघांच्या भाषणात तकलादूपणा होता, प्रामाणिकपणा नव्हता, जर असते तर त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करावे लागले असते
नाशिकमध्ये पाण्याचा विसर्ग वाढविल्याने रामकुंडात रात्री तरुण अडकला होता. पाण्यात अडकलेल्या तरुणाने तब्बल अर्धा तास सिमेंट खांबाचा आधार घेतला होता. स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमने त्याला रात्री बाहेर काढले. गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यानं तरुणाची फजिती झाली होती.
सलग 17 दिवसांपासून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. गोदावरी नदीची पूर परिस्थिती आहे. गंगापूर धरणातून सोडलेले पाणी अहिल्यादेवी होळकर ब्रिज येथून रामकुंडात प्रवाहित झाले. नाशिकमध्ये दैनंदिन पूजा विधी ,बाजारावर परिणाम दिसून आला.
नाशिकमधील गंगापूर धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्याने गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमते प्रवाहित झाला आहे. धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग पाहायला मिळत आहे.
आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना होत आहेत.
मनसेतील कार्यकर्ता रोहन पवार याच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्याने केला गुन्हा दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. मनसेच्या पदाधिकार्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदूरवरून जळगाव जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स वीस फूट खोल पुलावरून कोसळली. अपघातात 20 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती दिली आहे. या घटनेत लहान चिमुकल्यांचाही जखमीमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून सुरक्षेचे बोर्ड लावले आहेत.
नाशिकचं गंगापूर धरण 60 टक्क्यांपेक्षा अधिक भरलं आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. 5186 क्यूस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय.
कोंढवा बलात्कार प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त नितेश कुमार यांनी पहिल्यांदाच ऑन रेकॉर्ड माहिती दिली. कोंढवा बलात्कार प्रकरणानंतर पुण्यात महिला सुरक्षित नसल्याचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आम्ही 24 तासांत तपास करून तक्रार खोटी असल्याचं समोर आणलं. पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित असून कुणीही खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करू नका, असं ते म्हणाले.
“भगवान बुद्धही महाराष्ट्राच्या भूमीत विजयातून नाही तर शांततेतून पोहोचले. ते स्वत: इथे कधी आले नाहीत, पण त्यांचे शब्द आले आणि लोकांनी त्यांना ऐकलं. अजिंठ्याच्या शांत डोंगररागांमध्ये भिक्षूंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या. एका राजकुमाराच्या कथा.. ज्याने शांतीसाठी सर्वकाही सोडलं आणि जगाला दु:खातून मुक्त होण्याच मार्ग दाखवला,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘महाभारतातसुद्धा महाराष्ट्राचीच भूमी आहे. विदर्भ हा तो भाग आहे, जिथे दमयंतीची गोष्ट घडली, कोकणातील गुहांमध्ये अर्जुन ध्यानात बसला, असं लोककथांमध्ये सांगितलं जातं. महाभारतातल्या कृष्णकथेचा रमणीय भाग घडतो, तोही विदर्भातच,’ असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘महाराष्ट्रधर्म’ पॉडकास्ट आज आषाढी एकादशीपासून सुरू झाला आहे. दर महिन्याला एका विषयावर हा पॉडकास्ट होणार आहे. आजच्या पॉडकास्टचा विषय ‘महाराष्ट्राची अध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणीची ही गाथा… वारीची गाथा..’ हा आहे.
“महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे, याचं उत्तर शोधायचं असेल तर मागे जावं लागेल. त्या पायवाटांवर जिथे कधी देव रमले होते. महाराष्ट्राची कहाणी सुरूच होते ती देवाच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे”, असं ते या पॉडकास्टमध्ये म्हणाले.
नाशिक येथील ज्ञानेश्वरांच्या मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक करून साज शृंगार केला जाणार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये आळंदी नंतरच संत ज्ञानेश्वरांचे दुसरे मंदिर आहे.
पिंपरी चिंचवड सहमावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारा पवना धरण हे 72 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. यामुळे धरण व्यवस्थापनाने आजपासून पवना नदी पात्रात विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विदर्भाचे पंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूरमध्ये आषाढीच्या निमित्ताने सकाळपासून हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. आषाढी एकादशीला जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही, असे भावीक दर्शनासाठी रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथे दर्शनासाठी येत असतात.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सलग 17 दिवसांपासून गोदावरी नदी वाहत आहे. गंगापूर धरणातून सोडलेले पाणी अहिल्यादेवी होळकर ब्रिज येथून रामकुंडात प्रवाहित होत आहे. त्यामुळे रामकुंड परिसर पाण्यात गेला आहे.
नाशिकमध्ये संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नाशिकमधील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात ४ हजार ६५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीची पातळी आणखी वाढली आहे. यामुळे रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. ज्यामुळे शहरातील नदीकाठच्या परिसरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नालासोपारा, वसई आणि विरारमध्ये काल रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री 8 नंतर सुरू झालेल्या या रिमझिम पावसाने मध्यरात्रीनंतर अधिक जोर पकडला. ज्यामुळे नालासोपारा पूर्वमधील आचोळा रोड, नागीनदास पाडा आणि आचोळा पोलीस स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्यांवरील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. पहाटेपासून पावसाने उसंत घेतली असली तरी, आकाश अजूनही ढगांनी भरलेले आहे, त्यामुळे पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता कायम आहे.
राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज (६ जुलै) आणि उद्या (७ जुलै) अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने या परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी महाराष्ट्रात उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठू नामाचा गजर दुमदुमतोय. पंढरपूरमध्ये तर विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गांवर १८ ते २० लाख वारकरी आणि भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.