Maharashtra Budget 2026 : कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी सरकारला जोरदार टोला लगावला आहे, तसेच त्यांनी शेतकरी कर्जमाफीवरून देखील जोरदार हल्लाबोल केला.

Maharashtra Budget 2026 : कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 06, 2026 | 5:08 PM

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांना प्रोहत्साहन पण 50 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. यासोबतच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसंदर्भात इतरही काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान आता या अर्थसंकल्पावर  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी यावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आम्ही केली होती. दुर्दैवानं त्यानंतर कोरोना आला, जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून आम्ही 50 हजार रुपये देण्यास सुरुवात केली होती, आणि त्यानंतर आमचं सरकार पाडलं गेलं. एकूण जर अर्थसंकल्प पाहिला तर सातबारा कोरा झालेला नाहीचये, लाडक्या बहिणीना 2100 रुपये देणार होते, त्याचा कुठे उल्लेख नाहीये. ठेकेदारांसाठी मात्र ठोस योजना आहेत, अगदी डिटेलमध्ये मार्ग कुठून कुठपर्यंत होणार आहे? त्यासाठी किती कोटी खर्च हे अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये ठेकेदारांसाठी ठोस अशा योजना आहेत, मात्र शेतकरी आणि कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजळ दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला थोड्या दिवसाने कळेल की या अर्थसंकल्पामुळे त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  मला असं वाटतं की राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे सर्व जण जाणत आहेत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे मला नाही वाटत की त्यामधून राज्याचं काही हीत साधलं जाईल. तुम्हाला जर शेतकऱ्यांचं खरच काही भलं करायचं असेल तर पात्र अपात्र हा जो काही त्यांनी शा‍ब्दिक खेळ केला आहे. तो तसा न करता, ज्या पद्धतीने आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, त्याचप्रमाणे त्यांनी करावं असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us