रश्मिकाला लाज आणली.. विजय देवरकोंडाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे नेटकरी संतापले
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या आठवणींनी सुरू झालेली चर्चा आता विजयच्या वक्तव्यावर केंद्रित झाली आहे. काहींना त्याचं बोलणं विनोदी वाटलं, तर काहींनी त्यावर टीका केली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच ‘कॉफी विथ करण 9’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल अनेक मजेशीर खुलासे केले. मात्र, याचदरम्यान विजयने रश्मिकाने त्याला लग्नासाठी तब्बल शंभर वेळा विचारल्याचं सांगितलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू झाली. विजयचं हे वक्तव्य अनेक नेटकऱ्यांना आवडलं नाही. काहींनी त्याच्यावर रश्मिकाचा अपमान केल्याचा आरोप केला, तर काहींनी त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. ‘कॉफी विथ करण 9’च्या प्रोमोमध्ये करण जोहर विजय आणि रश्मिकाला त्यांच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. विजयने रश्मिकाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं का, असा प्रश्न करणने विचारला. त्यावर रश्मिकाने नकारार्थी मान हलवत त्यांच्या नात्यात नेमकं काय घडलं, हे सांगितलं.
रश्मिकानेच लग्नाचा विषय काढला होता. तिने विजयला ‘आपण लग्न करूया’ असं सांगितलं होतं. यावर विजयने तिला गंमतीने उत्तर दिलं की, ‘ठीक आहे, पण तू मला शंभर वेळा विचारलंस.’ त्यानंतर करणने रश्मिकाला याबद्दल विचारलं असता तिनेही स्पष्टपणे सांगितले की, तिने विजयला लग्नासाठी जवळपास वर्षभर विचारलं होतं. या संभाषणादरम्यान विजयने आपण वाईट व्यक्ती नसल्याचंही म्हटलं. दोघांमधील हा संवाद मजेशीर स्वरूपात मांडण्यात आला असला, तरी त्यातील एका विधानामुळे सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
प्रोमो समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विजयच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. रश्मिकाने लग्नासाठी पुढाकार घेतला, ही गोष्ट दोघांमधील खासगी आठवण म्हणून सांगता आली असती. मात्र, तिने आपल्याला शंभर वेळा लग्नासाठी विचारलं, असं सार्वजनिक व्यासपीठावर सांगण्याची गरज काय होती, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. एका नेटकऱ्याने विजयच्या वक्तव्यामुळे रश्मिकाचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया दिली. तर काहींनी प्रेमसंबंधांमध्ये एखाद्या व्यक्तीने लग्नासाठी पुढाकार घेणं ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नसल्याचं म्हटलं. प्रेमात कोण आधी व्यक्त झालं किंवा लग्नाचा प्रस्ताव कोणी मांडला, यापेक्षा दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला, हे महत्त्वाचं असल्याचंही काही चाहत्यांनी नमूद केलं.
विजय आणि रश्मिकाची ओळख ‘गीता गोविंदम’ या 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपटादरम्यान झाली. त्यानंतर ‘डिअर कॉम्रेड’मध्येही ही जोडी एकत्र दिसली. पडद्यावरील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे दोघांच्या नात्याबद्दल अनेक वर्षे चर्चा होत होती. मात्र, त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती सार्वजनिक केली नव्हती. अखेर फेब्रुवारी 2026 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यांच्या विवाहसोहळ्यात तेलुगू आणि कोडवा परंपरांचा समावेश होता. आता ‘कॉफी विथ करण 9’मधील त्यांच्या गप्पांमुळे चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळत आहे.
