
सध्या महाराष्ट्रात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात शिरुर, जुन्नर, अलिबाग, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्यासारखी वेषभूषा करुन या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कारण जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दररोज कुठे ना कुठे बिबट्याला जेरबंद करण्याच्या बातम्या येत आहेत. नरभक्षी बिबट्या सर्वसामान्यांच्या जीवावर उठला आहे. आता बिबट्यांनी जंगलाबाहेर येऊ नये यासाठी जंगलात शेळ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली.
सध्या महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तिथे वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांकडून मतदारसंघातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वाढू लागली आहे. देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी सभागृहात वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘बोमा टेक्निक’ चा अवलंब करण्याची मागणी केली. रात्री साडेबारा वाजता आमदार राजेश बकाने यांनी सभागृहात वन्य प्राण्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले.
बोमा पद्धतीचा अवलंब करा
वन्य प्राण्यांना सुरक्षितपणे राखीव जंगलात स्थलांतरित करण्यासाठी मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बोमा पद्धतीचा वापर करण्याची केली मागणी. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्ताची गरज असल्याची आमदार बकाने यांची मागणी आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पर्यायी उपाययोजना राबवण्याची गरज. बोमा तंत्राचा वापर सर्वप्रथम गांधी जिल्ह्यातील देवळी–पुलगाव मतदारसंघात करण्याची मागणी.
कोणी म्हणतात मेंढ्या सोडा
दोन दिवसपासून वाघ, बिबट्याचा विषय ऐकतो. कोणी म्हणतात जंगलात शेळया सोडा, कोणी म्हणतात मेंढ्या सोडा. रानडुक्कर, निलगाय, रोही यामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान होत आहे. ते जंगलात सोडा बिबट,वाघ गावात येणार नाही. म्हणून बोमा टेक्निकचा अवलंब करण्याची आमदार राजेश बकाने यांची मागणी.
तीन महिन्यात किती लोकांचा मृत्यू?
राज्यात 9 ते 10 हजार बिबट्यांची संख्या असल्याचं जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितलं. जुन्नर तालुक्यात मागच्या तीन महिन्यात 55 लोकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा सोनवणे यांनी केला.