विनायक राऊत यांना मोठा धक्का, सुनेने आरोप केलेले असतानाच मोठी अडचण; अखेर…

माजी खासदार विनायक राऊत यांना दुहेरी धक्का बसला आहे. सुनेने मानसिक छळ आणि शारीरिक अक्षमतेचे गंभीर आरोप केले असतानाच, त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. राऊत कुटुंबीयांवर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. राऊत यांनी हे षडयंत्र असून सुनेने साडेबारा कोटींची मागणी केल्याचा दावा केला आहे.

विनायक राऊत यांना मोठा धक्का, सुनेने आरोप केलेले असतानाच मोठी अडचण; अखेर...
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांना दुहेरी धक्का
| Updated on: Jul 13, 2026 | 1:12 PM

ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे चिरंजीव गितेश राऊत सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी या दोघांवरही गंभीर आरोप केले आहेत. राऊत कुटुंबाने मानसिक छळ केल्याचा आरोप गिरीजा राऊत यांनी केला आहे. तसेच गितेश राऊत हे शारीरिक संबंध ठेवण्यास अक्षम असल्याचा आरोपही गिरीजा यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली होती. गिरीजा यांच्या आरोपाने राऊत कुटुंबीय अडचणीत आलेले असतानाच विनायक राऊत यांचं संरक्षण काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले आहे. संरक्षण शाखा-1 कडून पत्राद्वारे संरक्षण मागे घेतल्याची माहिती राऊत यांना देण्यात आली आहे. यापूर्वी 30 मे रोजी राऊत यांना सुरक्षा काढण्याबाबत अधिकृत पत्र पाठवण्यात आले होते. त्यावर संरक्षण कायम ठेवावे, अशी विनंती करत विनायक राऊत यांनी पुन्हा पत्रव्यवहार केला होता. मात्र संरक्षण शाखा-1 ने त्यांची मागणी अमान्य करत संरक्षण पुन्हा देण्यास नकार दिला. दरम्यान, विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असतानाच आता संरक्षणही गेल्याने राऊत यांना धक्का बसला आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राऊतांचा दावा काय?

दरम्यान, विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. गेल्याच महिन्यात माझं संरक्षण काढण्यात आलं आहे. मी संरक्षण देण्याची मागणी केली होती. मागणी करूनही ती मान्य केली गेली नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे.

आम्ही बाहेर पडू

तसेच राऊत यांनी आज पुन्हा एकदा सुनेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या मागे षडयंत्र आहे. मी आज पुरावा देणार नाही. पण यामागे षडयंत्र असून त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाचा आहे, हे मी नंतर सांगणार आहे, असं सांगतानाच कितीही षडयंत्र झाले तरी माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. यातून आम्ही बाहेर पडू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

साडे बारा कोटी मागितले

माझ्या सुनेने आमच्याकडे साडेबारा कोटी रुपये मागितले. सुनेची मागणी वाढतच होती. आधी पाच कोटी मागितले. त्यानंतर साडेबारा कोटी मागितले. फ्लॅट आणि कारही मागितली. तसेच घराचे हप्ते आम्हीच भरावेत, असंही सूनेचं म्हणणं आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

 

Follow Us