Suchitra Bandekar : शेवटी चॅनलचे आणि आपले पैसे, बोलणारे १० तोंडांनी…; मालिकेसाठी सुनेलाच का घेतलं? सुचित्रा बांदेकरांनी स्पष्टच सांगितलं
Suchitra Bandekar On Pooja Birari : अभिनेत्री पूजा बिरारी झी मराठी वाहिनीवरील 'येतेच आता मी नांदायला' या मालिकेत झळकणार आहे. ही सोहम प्रोडक्शनचीच मालिका असून सुचित्रा यांनी पूजाच्या कास्टिंगचा किस्सा सांगितला आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘येतेच आता मी नांदायला‘ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिका साकारणार आहे. पूजा बिरारी ही आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरची पत्नी आहे. तसंच ‘येतेच आता मी नांदायला‘ ही मालिकासुद्धा सोहम प्रोडक्शनची आहे. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत सुचित्रा बांदेकर यांनी पूजा बिरारीच्या सिलेक्शनचा किस्सा सांगितला आहे.
सुचित्रा बांदेकर यांनी सांगितला किस्सा
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की, ‘आम्ही मालिकेची जुळवाजुळव करत होतो तेव्हा पूजाची मालिका नुकतीच संपलेली आणि ती सुट्ट्या एन्जॉय करत होती. मी अभिनेत्रीच्या शोधात होते. खूप जणींचे आम्ही ऑडिशन्स घेतले. पण, त्या भूमिकेची गोष्ट असते. त्यावेळी पूजा मजा करत होती.’
‘मी तेव्हा तिला विचारलं, एक ऑडिशन देतेस का? त्यावेळी पूजा म्हणाली, ‘नको, सगळ्यांचं असं होईल की, आपलं प्रोडक्शन हाऊस आहे, म्हणून तुम्ही मला घेतलं‘ त्यावर मी तिला म्हटलं, हे बघ…बोलणारे 10 तोंडांनी बोलणारे आहेत. शेवटी पैसे आपले लागलेत, झीचे लागलेत, ते तर असं नाही करणार की, बांदेकरांची सून आहे म्हणून हिला घेऊया, असं होऊच नाही शकत. आपल्या इथे हे असं चालत नाही. मी तिला म्हटलं, जर तू मनापासून ऑडिशन देणार असशील तर दे. तेव्हा तिनं ऑडिशन दिली आणि मग 3-4 जणींची निवड झाली. त्यातून मग पूजाची निवड करण्यात आली.’ असं सुचित्रा यांनी सांगितलं. ‘राजश्री मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा बांदेकर बोलत होत्या.
दरम्यान, सोहम बांदेकरनं अभिनेत्री पूजा बिरारीसोबत 2 डिसेंबर 2025 रोजी लग्नगाठ बांधली. या शाही विवाहसोहळ्याची मराठी मनोरंजनविश्वात मोठी चर्चा झाली होती. लोणावळ्यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. पूजा बिरारीच्या कामाबद्दल सांगायचं तर ती शेवटची ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत दिसली होती.
