Mumbai Water Taxi: नवी मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया अवघ्या 40 मिनिटांत, कसं घ्या जाणून ?

मुंबई आता लवकरच नवी मुंबई विमानतळाशी जलमार्गाने जोडली जाईल. नवी मुंबई विमानतळाला मुंबईशी जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. ही सेवा सुरू झाल्यामुळे मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास फक्त 40 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो.

Mumbai Water Taxi: नवी मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया अवघ्या 40 मिनिटांत, कसं घ्या जाणून ?
वॉटर टॅक्सी
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 05, 2025 | 10:00 AM

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी आता एका खुशखबर आहे. मुंबई आता लवकरत जलमार्गाद्वारे नवी मुंबईशी जोडली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळाला मुंबईशी जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, असे मत्स्यव्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. आवश्यक ठिकाणी जेट्टी बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास फक्त 40 मिनिटांत पूर्ण होईल.

मंत्रालयात झाली बैठक

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात एक बैठक झाली. या बैठकीसाठी वाहतूक, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल आणि महाराष्ट्र सागर मंडळाचे प्रदीप बधी यांच्यासह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

आत्ता कशी आहे व्यवस्था ?

वॉटर टॅक्सींसाठी टर्मिनल बांधण्याचे काम हळूहळू सुरू करावे, असे राणेंनी सांगितलं. यासंदर्भातील परवानगीसाठी विमानतळ प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल. मालवाहतुकीसाठी जेट्टी बांधण्यासाठीही जागा निश्चित करावी. सध्या मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्ग, विलासराव देशमुख ईस्टर्न फ्रीवे आणि हार्बर रेल्वे लाईन असे मार्ग आहेत.

वॉटर टॅक्सी मार्ग कुठून कुठपर्यंत ?

रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी चालवण्याची योजना आहे. या मार्गावरील इतर थांब्यांचीही तपासणी केली जात आहे. या प्रवासासाठी इलेक्ट्रिक बोटी वापरल्या जातील. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणासाठी एक नवीन मार्ग खुला होईल. तसेच, लोक वाहतूक कोंडीशिवाय नवी मुंबईला लवकर पोहोचू शकतील. यामुळे प्रवासाचा बराच वेळ वाचणार आहे.

नितेश राणे काय म्हणाले ?

मुंबईभोवती जलवाहतुकीचे अनेक पर्याय आहेत आणि त्यांचा वापर केला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी तसेच मालवाहतुकीसाठी वापरता येतो. नवी मुंबई, ठाणे सारखी शहरे जलमार्गाने मुंबईशी जोडणे सोपे आहे. यासाठी चांगले नियोजन आणि इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत आहे असेही त्यांनी नमूद केलं.