देशसेवा करताना लेफ्टनंट कर्नल यांचा गेला प्राण, भारत-चीन बॉर्डरवर बजावत होते कर्तव्य

आवारी हे अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन बॉर्डरवर कर्तव्य बजावत होते.

देशसेवा करताना लेफ्टनंट कर्नल यांचा गेला प्राण, भारत-चीन बॉर्डरवर बजावत होते कर्तव्य
भारत-चीन बॉर्डरवर बजावत होते कर्तव्य
Image Credit source: t v 9
| Updated on: Oct 06, 2022 | 3:04 PM

विवेक गावंडे, TV9 मराठी प्रतिनिधी, यवतमाळ : वणी तालुक्यातील सुपूत्र लेफ्टनंट कर्नल (Lt. Col.) वासुदेव आवारी हे अरुणाचलप्रदेशात कर्तव्यावर होते. भारत-चीन सीमेवर (India-China border) समुद्रसपाटीपासून उंचीवर ते कार्यरत होते. अशात त्यांना श्वास घेण्यास अडचण वाटू लागली. अस्वस्थ वाटल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी (Vasudev Awari) यांच्या पार्थिवावर उद्या सात ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम त्यांच्या मूळगावी मुर्धोनी येथील सामुदायिक प्रांगणात होईल.

कामठी मिलिटरीतर्फे सलामी

आज गुरुवारी दुपारी वासुदेव आवारी यांचे पार्थिव गुवाहाटीवरून विमानाने नागपूर विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी कामठी मिलिटरी बेस्टतर्फे त्यांना मानवंदना व सलामी दिली जाणार आहे.

लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव संध्याकाळी पाच वाजता वणी येथे पोहचणार आहे. कर्नल वासुदेव दामोदर आवारी हे 170 फिल्ड रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. नुकतेच त्यांना मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली होती.

उंचीवर श्वास घेण्यास त्रास

आवारी हे अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन बॉर्डरवर कर्तव्य बजावत होते. हे ठिकाण समुद्र पातळीवरून 16 हजार फूट उंचीवर आहे. दुपारच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

आवारी यांना तात्काळ गुवाहाटीतील 151 मिलिटरी बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

एका तरुण देशसेवकाचा अकाली मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. अरुणाचल प्रदेशसारख्या बॉर्डरवर जवानांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.