रिव्ह्यू: फसलेला 'रेडीमिक्स’

आतापर्यंत प्रेमाचा त्रिकोण असलेले अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये आपण बघितले. बॉलिवूडच्या तुलनेत मराठीत हा प्रयोग फार कमी दिग्दर्शकांनी हाताळला. ‘रेडीमिक्स’ हा चित्रपटही त्याच पठडीतला. वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे आणि नेहा जोशी अशी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट बघितल्यावर हाती निराशाच लागते. बऱ्याचदा तर चित्रपट बघताना याचसाठी मांडला होता का हा …

रिव्ह्यू: फसलेला 'रेडीमिक्स’

आतापर्यंत प्रेमाचा त्रिकोण असलेले अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये आपण बघितले. बॉलिवूडच्या तुलनेत मराठीत हा प्रयोग फार कमी दिग्दर्शकांनी हाताळला. ‘रेडीमिक्स’ हा चित्रपटही त्याच पठडीतला. वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे आणि नेहा जोशी अशी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट बघितल्यावर हाती निराशाच लागते. बऱ्याचदा तर चित्रपट बघताना याचसाठी मांडला होता का हा अट्टहास ? असं राहून राहून जाणवतं.

समीर, नुपूर आणि सानिका या तिघांभोवती या सिनेमाचं कथानक फिरतं. समीर हा पुण्यातील एक इंटिरिअर डेकोरेटर. आजीसोबत राहणारा. साधा, सरळ, खूप खूप विचार करून निर्णय घेणारा तरुण. नुपूर ही पुण्यातील एक अॅम्बीशिअस मुलगी जिचा कोणत्याच धंद्यात जम बसत नाही आणि तिला लवकरच स्वतःचं काहीतरी सुरु करायचं आहे. नुपूरची मोठी बहीण सानिका एक डॅशिंग वकील. पण ब्रेकअप झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेली युवती. समीर नुपुरसोबत मिळून सानिकाला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. सानिका समीरच्या प्रेमात पडते. आपल्या बहिणीवर नितांत प्रेम करणारी नुपूरही समीरला सानिकाचा स्वीकार करायला सांगते. आता समीर नुपूरकडे आपलं प्रेम व्यक्त करेल का? नुपूर समीरच्या प्रेमाचा स्वीकार करेल का? सानिकाला समीर आणि नुपूरच्या प्रेमाबद्दल कळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला रेडीमिक्स हा सिनेमा बघावा लागेल.

चित्रपटाचं कथानक जरी इंटरेस्टिंग वाटत असलं तरी दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांना हे कथानक फुलवण्यात अपयश आलं आहे. जालिंदर कुंभार हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव. अनेक नावाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. पण मालिका आणि चित्रपट यामध्ये फरक असतो हे जालिंदर यांनी लक्षात घ्यायला हवं होतं. चित्रपटात बरेच प्रसंग लांबलचक असल्यामुळे एका ठराविक वेळेनंतर चित्रपट कंटाळवाणा होतो. त्यामुळे आपण मालिका नाही तर चित्रपट दिग्दर्शित करतो आहोत याचं भान जालिंदर कुंभार यांनी ठेवायला हवं होतं.

चित्रपट बऱ्याच ठिकाणी चकचकीत वाटायला लागतो. पण ‘खोदा पहाड निकला चुहा’ ही म्हण या चित्रपटाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. खरंतर चित्रपटाचा विषय तरुणाईला आकर्षित करणारा आहे. पण बऱ्याच गोष्टी चित्रपटात चुकल्यासारख्या वाटतात. काही सिरीयस प्रसंग बघताना तर चक्क हसू येतं. याचा दोष नेमका कलाकारांना द्यायचा की दिग्दर्शकाला हा प्रश्न अजूनही मला सतावत आहे. त्यातच नुपूर-समीर-सानिका असा लव्हट्रॅण्गल सुरु असताना, नुपूर समीर आपल्यापासून दूर व्हावा यासाठी त्याला आपण लेस्बियन असल्याचं सांगते. तेव्हा तर आपण कुठली शिक्षा भोगावी म्हणून हा चित्रपट बघतोय असा प्रश्न सातत्यानं पडू लागतो. बरं हा ट्रॅक तेवढ्यावरचं न थांबता समीर आणि नुपूरची कॉमन मैत्रीण त्यांचं संभाषण ऐकते काय आणि लगेचच तिलाही आपलं नुपूरवर प्रेम असल्याचा साक्षात्कार होतो काय, सगळा ‘आनंदी आनंद गडे’ प्रकार सुरु होतो.

असा ट्रॅक भरकटत, बाष्कळ विनोद करत करत अखेर हा चित्रपट संपतो आणि आपण सुटकेचा निश्वास सोडतो. या चित्रपटात खरी जान आणलीये ती म्हणजे आनंद इंगळे यांनी. आपल्या छोट्या भूमिकेत आनंदनं जबरदस्त धमाल केली आहे. हाच या चित्रपटाचा एकमेव प्लस पॉईंट. वैभवनंही समीर उत्तम साकारला आहे. नेहा जोशी आणि प्रार्थनानंही आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. पण आडातचं नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणा.

अविनाश-विश्वजीत यांचं संगीत निराश करतं. चित्रपटातील एकही गाणं लक्षात राहत नाही. त्यामुळे एकूणचं काय तर सगळ्या पातळ्यांवर हा सिनेमा तुम्हाला निराश करतो. या चित्रपटाला मी देतोय एक स्टार.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *