कोकण किनारपट्टीला 'क्यार' चक्रीवादळाचा धोका, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला ‘क्यार’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे (Kyarr Cyclone). त्यामुळे कोकणवासीयांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला तोंड द्यावं लागू शकतं. येत्या दोन दिवसात हे क्यार चक्रीवादळ कोकणसह गोव्यातही धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

Kyarr Cyclone will hit Kokan Coast, कोकण किनारपट्टीला ‘क्यार’ चक्रीवादळाचा धोका, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला ‘क्यार’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे (Kyarr Cyclone). त्यामुळे कोकणवासीयांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला तोंड द्यावं लागू शकतं. येत्या दोन दिवसात हे ‘क्यार’ चक्रीवादळ कोकणसह गोव्यातही धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे (Kyarr Cyclone at Kokan). त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत कालपासून (24 ऑक्टोबर) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं आहे (Kyarr Cyclone will hit Kokan). समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने याचा फटका मच्छिमारांना बसला आहे. मध्यरात्रीपासून किनारपट्टीवर जोरादार वारा आणि पाऊस सुरू आहे. मालवणच्या देवबाग परिसरात समुद्राच्या उधाणाचं पाणी शिरलं आहे. त्यात आता पुढील दोन दिवसात ‘क्यार’ चक्रीवादळ येऊन धडकणार असल्याने येथील नागरिक संकटात सापडले आहे.

क्यार चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत कोकण किनारपट्टीवरील ग्रामस्थांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर मच्छिमारांना दोन दिवस समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय, कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही काही दिवस कोकणात न येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘क्यार’ चक्रीवादळाचे केंद्र आज सकाळी साडे अकरावाजता रत्नागिरीपासून पश्चिमेला 190 किलोमीटरवर अरबी समुद्रात होते. पुढील 24 तासांत चक्रीवादळ थोडे उत्तरेकडे सरकून कोकण किनारपट्टीच्या विरुद्ध दिशेला वळण घेईल. पुढील पाच दिवस क्यार चक्रीवादळ ओमनच्या दिशेने अरबी समुद्रातून प्रवास करणार असून, या काळात त्याची तीव्रता अतितीव्र चक्रीवादळापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

‘क्यार’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर पुढील 24 तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून, दक्षिण कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर उत्तर कोकणात काही ठिकाणी जास्त पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. कोकण किनारपट्टीवर पुढील 24 तासांत तशी 40-50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यांचा सर्वोच्च वेग ताशी 65 किलोमीटर पर्यंत पोहचू शकतो.

वादळ थेट किनारपट्टीला धडकणार नसले तरी, पुढील 24 तासांत त्याच्या घेऱ्यातील ढगांमुळे कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे झाडे पडणे, पत्रे उडून जाणे अशा घटना घडू शकतात, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

तसेच, पुढील 24 तासांत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर चक्रीवादळाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबई-गोवा महामार्ग, तसेच कोकणात जाणाऱ्या घाट रस्त्यांवरून प्रवास टाळावा. 27 ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीवरील पर्यटनही टाळावे. 27 तारखेनंतर चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल. पावसाचे प्रमाणही कमी होईल, असंही सांगण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *