कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मैदानात उतरले; खळबळजनक आरोपाने राजकीय वातावरण तापलं
CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मैदानात उतरले आहेत. त्यांनी फंडिंगच्या मुद्दायावरून खळबळजनक आरोप केला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आता निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दिपकेंचा 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. पहिलं आंदोलन यशस्वी झालं. त्यानंतर दुसऱ्या आंदोलनाची हाक दिली. त्यामुळे अनेक राजकीय नेते कॉक्रोच जनता पार्टीच्या फंडिंगवर सवाल उपस्थित करत आहेत. आता त्यात सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींची भर पडली आहे. माजी न्यायमूर्तींनी कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात गंभीर आरोप केला आहे.
माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी एक्सवर पोस्ट करत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं की, भारतात सुरू असलेल्या आंदोलनामागे अमेरिकेच्या सरकारचा हात असेल. ते गुप्तपणे फंडिंग करत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्समध्ये सहभागी झाल्याने अमेरिका नाराज आहे. ब्रिक्सचं नेतृत्व हे चीन आणि रशिया करतात, त्यांनी अमेरिकेला शत्रू मानलं आहे’. काटजू यांनी सीजेपीच्या विरोधात आणखी एक मोठा आरोप केला. ते म्हणाले की, मोदी सरकार हे या देशांच्या अधिक जवळ जात आहे. यामुळे वॉशिंग्टन भारतात असंतोष निर्माण करत आहे’.
तत्पूर्वी, भारताने सप्टेंबर 2026 मध्ये नवी दिल्लीत 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. तसेच रशियासोबत द्विपक्षीय चर्चा केली होती. भारत हा रशियाच्या कच्च्या तेलाचा दुसरा मोठा खरेदीदार आहे. दोन्ही देश 2030 सालापर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा मार्गावर दोन्ही देश आहेत. याच आधारावरून काटजू दावा करत आहेत. रशियन तेलाच्या खरेदीवरून भारत-अमेरिकेत मतभेद निर्माण झाले आहे. एकीकडे भारत ब्रिक्सच्या माध्यमातून रशिया आणि चीनसोबत संतुलित संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु भारताचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण अमेरिकेला पसंत नसल्याची चर्चा जागतिक वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अमिरेका आणि भारतातील काही मतभेदादरम्यान काटजू यांचे विधान चर्चेत आलं आहे.
