‘देशात अघोषित आणीबाणी’, BBC वरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक, भाजपचं प्रत्युत्तर काय?

काँग्रेसच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना गौरव भाटिया म्हणाले, ज्यांच्यावर छापे टाकले आहेत, ते भारतातल्या कायद्याचं पालन करत असतील तर चिंता कशाला?

देशात अघोषित आणीबाणी, BBC वरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक, भाजपचं प्रत्युत्तर काय?
बीबीसीचे दिल्ली येथील ऑफिस
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 14, 2023 | 3:28 PM

नवी दिल्लीः बीबीसीच्या (BBC) दिल्ली आणि मुंबई ऑफिसमध्ये आयकर (Income Tax) विभागाची छापेमारी सुरु झाल्याने एकच खळबळ माजली आहे. दोन्ही ठिकाणच्या कार्यालयांना सील करण्यात आलं आहे. तेथे काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. बीबीसीने गुजरात दंग्यांवर एक डॉक्युमेंट्री पुन्हा दाखवण्यात आली होती. यानंतर काही आठवड्यातच ही कारवाई करण्यात आली. बीबीसीच्या कार्यलयांची आयटी विभागातर्फे झाडाझडती घेतली जात आहे. केंद्र सरकारने या डॉक्युमेंट्रीवर बंदी तर घातलीच आहे. आता ही छापेमारी म्हणजे अघोषित आणीबाणीच आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. तर भाजपनेही याला प्रत्युत्तर दिलंय. पत्रकारितेच्या आडून बीबीसी छुपा अजेंडा राबवत असल्याची टीका भाजपने केली आहे.

बीबीसीवरील छापेमारीनंतर काही वेळातच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आयकर विभाग नियमानुसार, कारवाई करत आहे. मात्र काँग्रेस, टीएमसी आणि बीआरएसची प्रतिक्रिया हा चिंतेचा विषय आहे. केंद्र सरकारच्या एजन्सी पिंजऱ्यातील पोपट नव्हे तर आपले कर्तव्य करत आहे, अशी प्रतिक्रिया भाटिया यांनी दिली.

देशात अघोषित आणीबाणी- काँग्रेस

तर बीबीसीच्या छापेवारीवरून काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, ही एक प्रकारे अघोषित आणीबाणी आहे. अदानी प्रकरणी आम्ही जेपीसीची मागणी केली तर सरकार बीबीसीच्या मागे लागली आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली आहे.

‘भारताविरोधात बीबीसीचा छुपा अजेंडा’

यावर प्रतिक्रिया देताना गौरव भाटिया म्हणाले, ज्यांच्यावर छापे टाकले आहेत, ते भारतातल्या कायद्याचं पालन करत असतील तर चिंता कशाला? आयकर विभागाला त्याचं काम करू द्यावं. दूध का दूध, पानी का पानी सिद्ध होईळ. बीबीसी भारताविरोधात छुपा प्रपोगंडा राबवण्याचं हत्यार बनत आहे. भारताविरोधात द्वेष भावनेतून काम करण्याचा बीबीसीचा इतिहास असल्याची प्रतिक्रिया भाटिया यांनी दिली.

‘इंदिरा गांधींनीही BBC बॅन केलं होतं’

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना भाजप नेत्याने प्रतिक्रिया दिली. इंदिरा गांधी यांनीही बीबीसीवर बंदी घातली होती. बीबीसीच्या स्वतंत्र पत्रकारितेचं स्वागत आहे. पण पत्रकारितेच्या आडून ते छुपा अजेंडा राबवतात. काश्मीरमध्ये एक दहशतवाद्याला करिश्माई तरुण उग्रवादी संबोधण्यात आलं. होळी हा वाईट सण असल्याचं म्हटलं. तर महात्मा गांधी यांचा अनादर केल्याचा आरोप भाजपने केला आहे.