48 तासांत काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा; नागरी वस्तीत लपले होते 3 जण

जम्मू-काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला मोठं यश मिळालं आहे. शोपियानमधील केलर आणि पुलवामामधील त्रास परिसरात हे ऑपरेशन्स राबविण्यात आले होते. अत्यंत दुर्गम भागात सैन्याने ही यशस्वी कामगिरी केल्याची माहिती समोर आली आहे.

48 तासांत काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा; नागरी वस्तीत लपले होते 3 जण
army
Image Credit source: ANI
| Updated on: May 16, 2025 | 12:49 PM

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरोधातील कारवाया सुरूच आहेत. नुकतंच भारतीय सैन्याला त्यात मोठं यश मिळालं आहे. 48 तासांत काश्मीरमधील सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती भारतीय सैन्याने पत्रकार परिषदेतून दिली. यातील एक ऑपरेशन शोपियानमधील केलर परिसरात आणि दुसरं ऑपरेशन पुलवामाच्या त्रालमध्ये पार पाडण्यात आलं. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असं आश्वासन यावेळी मेजर जनरल धनंजय जोशी यांनी दिलं. शिवाय सर्व सुरक्षादलांचा ताळमेळ असल्यानेच ही कारवाई यशस्वी ठरल्याचं त्यांनी सांगितलं.

केलर आणि त्रास भागात दहशतवादाविरोधातील कारवायांबद्दल जीओसी व्ही फोर्सचे मेजर जनरल धनंजय जोशी म्हणाले, “22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर आम्ही काही परिसरांवर लक्ष केंद्रीत करत होतो. इंटेलिजन्सकडून आम्हाला माहिती मिळत होती. दहशतवाद्यांचे ग्रुप्स हे बर्फ वितळल्यानंतर जंगलात लपले आहेत, असं समजलं होतं. त्यानुसार उंच पर्वतांवरील जंगलांमध्ये आम्ही सैन्य तैनात केलं होतं. 12 तारखेला रात्री शोपियानमधील केलर परिसरात एक दहशतवादी ग्रुप असू शकतं, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. तिथे आधीपासूनच जे सैनिक तैनात होते ते लक्ष ठेवून होते. त्यानंतर 13 मे रोजी सकाळी जेव्हा त्यांना काही संशयास्पद हालचाली आढळल्या, तेव्हा त्यांनी कारवाई केली. त्याठिकाणी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले. ज्या ठिकाणी हे ऑपरेशन केलर पार पडलं, ती जागा खूप उंचावर, दुर्गम होती.”

“दुसरं ऑपरेशन त्राल भागातील सीमावर्ती गावात करण्यात आलं. तिथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. आम्ही त्या गावाला वेढा घालत असतानाच दहशतवाद्यांनी नागरी वस्तीतील घरांमध्ये लपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमच्यावर गोळीबार केला. त्यावेळी ग्रामस्थांना, लहान मुलांना, महिलांना, वृद्धांना वाचवण्याचं आमच्यासमोर मोठं आव्हान होतं. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर आम्ही तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला,” अशी माहिती त्यांनी दिली.

सैनिकांनी ठार मारलेल्या सहा दहशतावाद्यांपैकी एक शाहिद कुट्टे हा एका जर्मन पर्यटकावरील हल्ल्यासह इतर दोन मोठ्या हल्ल्यांमध्ये सहभागी होता. तो दहशतवादी कारवायांसाठी निधी देण्यातही हातभार लावत होता. त्रालच्या चकमकीत शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आली. “हे दोन्ही ऑपरेशन्स अत्यंत दुर्गम ठिकाणी राबवले गेले होते. एक अत्यंत उंचावर आणि दुसरं व्हॅली परिसरात होतं. यावरून हे सिद्ध होतंय की दहशतवादी कुठेही लपले असले तरी त्यांना शोधून आम्ही मारू,” अशी भूमिका जोशी यांनी मांडली. त्याचप्रमाणे या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला असून काश्मीर घाटीतील दहशतवाद्यांचा कट आम्ही अयशस्वी केला. यात गुप्तचर खात्याची मोठी मदत झाली, असंही ते पुढे म्हणाले.