
नवी दिल्ली | 9 डिसेंबर 2023 : अयोध्येतील भव्य राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वीच प्रसिद्ध लेखक आणि ‘टीव्ही9 भारतवर्ष’चे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा यांच्या ‘राम फिर लौटे’ या पुस्तकाचं आज थाटात प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकातून प्रभू रामाचा जीवन प्रवास, राम मंदिराशी संबंधित आंदोलनासह अयोध्येच्या सांस्कृतिक मूल्यांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रभात प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलंय. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अलोक कुमार हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. अयोध्येतील सोहळ्याच्या दिवशी आपल्याला टीव्हीवर नव्हे, तर आपल्या परिसरातील मंदिराला एका दिवसासाठी अयोध्या मानलं पाहिजे, असं अलोक कुमार म्हणाले. तर, धर्माच्या स्थापनेसाठी नाईलाजाने रक्त सांडवावं लागलं तर आपल्याला ते सहन केलं पाहिजे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलंय.
दिल्लीच्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये ‘राम फिर लौटे’ या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. याप्रसंगी स्वामी ज्ञानानंदजी महाराज उपस्थित होते. तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमारही उपस्थित होते.
आलोक कुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. एखादा असा प्रसंग असतो, एखादं असं दृश्य असतं की ते पाहण्यासाठी देवताही आतूर असतात. 500 वर्षाची प्रतिक्षा, 20 ते 25 पिढ्यांचा संघर्ष, 74 युद्ध या सर्वांनंतर हे मंदिर बनत आहे. 22 जानेवारी रोजी हजारो संत आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रामलल्ला आणि त्यांची भव्य मूर्ती त्यांच्या जन्मस्थानावर बनलेल्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठित केली जाणार आहे, असं आलोक कुमार म्हणाले.
राम घरातील मंदिरात विराजमान होणार आहेत. हा सोहळा तुम्ही घरात टीव्हीवर पाहू नका. तुम्हाला तुमच्या मोहल्ल्यातील मंदिरालाच एक दिवसासाठी अयोध्या बनवायची आहे. संपूर्ण समाजाला या मंदिराजवळ हजर राहायचं आहे. रामाचा जयजयकार करायचा आहे. विजय महामंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होईल. जेव्हा अयोध्येत आरती सुरू होईल तेव्हा जगातील पाच लाखाहून अधिक मंदिरात करोडो लोक एक साथ आरतीमध्ये सहभागी होतील.
ram phir laute
आमची वेळ आली आहे. हे शतक आमचं शतक आहे. हेच या आरतीतून जगाला दाखवून दिलं जाईल. त्या दिवशी जो कार्यक्रम होईल तो राम आणि केवटराजचं स्मरण करेल. तसेच आपल्या हृदयातील पुण्य भाव भरून काढेल. सर्वांच्या मनात राम असेल. कुणीही लहान मोठा नसेल. कोणीही स्पृश्य-अस्पृश्य नसेल, असंही आलोक कुमार म्हणाले.
राम आपली आस्था आहे. हे निश्चित आहे. राम आपली पूजाही आहे. राम आपली परंपराही आहे. राम आपली अस्मिताही आहे. राम आपला स्वाभिमान आहे. राम आपली ओळख आहे. प्रभू रामाबाबत जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. शब्दही अपुरे पडतील. राम आपलं तन आणि मंदिरही आहेत. राम आपल्या मन मंदिरात आहेत. राम आपल्या कणाकणात आहेत, असं स्वामी ज्ञानानंदजी महाराज म्हणाले.
राम अयोध्येत महालात प्रकटले. पण स्वेच्छाने 14 वर्ष वनवासात गेले. प्रभू रामाच्या वनवासामुळे अयोध्येत रिक्तता आली असेल, पोकळी निर्माण झाली असेल. पण हाच वनवास अनेकाचं आयुष्य फुलवून गेला आहे. आपलं भारतीय दर्शन काय आहे याचं स्पष्ट चित्रण जगासमोर ठेवण्यासाठी राम वनावसात जाऊन अयोध्येत पोकळी करून जातात.
ram phir laute
पण 14 वर्षाच्या वनवासात कुठे केवटची होडी मागवून, कुठे निषादाची गळाभेट घेऊन, तर कुठे शबरीकडे जाऊन राम आपलं भारतीय दर्शन चिन्हांकीत करतात, असं स्वामी ज्ञानानंदजी महाराज म्हणाले. राम शबरीकडे गेले. तेव्हा मी स्तुती करून घेण्यासाठी आलो नाही, तर स्वत: स्तुती करायला आलो आहे, असं राम म्हणाले. प्रभू रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती, हे रामावर टीका करणारे सोयीस्करपणे विसरून जातात, असंही ते म्हणाले.
राम राम शुभ आहे. राम राम मंगल आहे. राम राम प्रेरणा आहे. हा जीवनाचा प्रकाश आहे. राम-राम हा जीवनाचा प्रारंभ आहे. आणि राम-राम जीवनाचा अंतही आहे. ‘भीम’च्या नावाने असलेल्या केंद्रात रामाच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे, असं संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले. हेमंत शर्मा यांनी यापूर्वीही अयोध्येवर दोन पुस्तके लिहिली आहेत. हे त्यांचं तिसरं पुस्तक आहे. मी हेमंतजींचं हृदयपासून अभिनंदन करतो. वंदे भारतच्या स्पीडने हे पुस्तक लिहिल्याचं हेमंतजींनी सांगितलंय, असंही होसबळे म्हणाले.
राम धर्माचे मूर्तिमान आहेत. राम धर्माचे विग्रह आहेत. राम स्वत: धर्म आहेत. राम राष्ट्र आहेत. जिथे राम, तिथे वन आहे आणि जनही आहे. जिथे राम नाही, तिथे जन सुद्धा वनासारखेच आहेत. जिथे जीवनातील सर्वोत्तम आहे, तिथे राम आहेत. राम मंदिर केवळ पर्यटनासाठी बनवलेलं नाहीये, तर दिल्लीवर अयोध्येचं वर्चस्व असलं पाहिजे. अयोध्या म्हणजेच लोकशाही. राम नियम आणि संविधानाशी बांधिल आहेत.