मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
दिल्लीतील जंतर मंतरवर पेपरफुटी विरोधात आंदोलन सुरू असताना आता उत्तराखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंड तांत्रिक विद्यापीठातील अभियांत्रिकीचे दोन पेपर फुटले आहेत, त्यानंतर आता विद्यापीठाने दोन्ही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

दिल्लीतील जंतर मंतरवर पेपरफुटी विरोधात आंदोलन सुरू असताना आता उत्तराखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंड तांत्रिक विद्यापीठातील अभियांत्रिकीचे दोन पेपर फुटले आहेत, त्यानंतर आता विद्यापीठाने दोन्ही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या घटनेतील आरोपी शिक्षक आशीष कुमार हे शिवालिक कॉलेजमध्ये प्राध्यापक असून, ते प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या टीममध्ये होते. त्यांच्यावर परीक्षेतील प्रश्नांसारखेच प्रश्न एका कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना पाठवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता परीक्षा रद्द करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
उत्तराखंडमधील पेपरफुटीच्या घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणात संबंधित महाविद्यालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सध्या देशभरात पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू असताना ही घटना समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विद्यार्थी सातत्याने पेपरफुटी थांबवण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. संपूर्ण देशात आवाज उठवला जात असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कुलगुरूंनी काय म्हटले?
वीर माधो सिंह भंडारी उत्तराखंड तांत्रिक विद्यापीठाच्या कुलगुरू तृप्ता ठाकूर यांनी सांगितले की, संबंधित शिक्षक ज्या महाविद्यालयाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाईची करण्यात आली आहे. आमच्या विद्यापीठाने पुढील सात वर्षांसाठी त्या शिक्षकाला कोणत्याही परीक्षा प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपल्या 22 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड केली आहे.”
तृप्ता ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘अशा शिक्षकांना भविष्यात विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षेशी जोडले जाऊ नये, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. संबंधित महाविद्यालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा. आम्ही महाविद्यालयाला स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी केलेल्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही. सुरुवातीला एका विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आले होते. मात्र चौकशीदरम्यान आणखी एक प्रश्नपत्रिकाही आधीच फुटल्याचे आढळले. त्यामुळे ती परीक्षाही रद्द करण्यात आली. या दोन्ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात पुन्हा घेण्यात येतील, याच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.