
प्रेम तुम्हाला कधी कोणत्या वाटेवर नेऊन ठेवले, याचा काहीही नेम नाही. बिहारमधील दरभंगा गावात याचाच प्रत्यय आला. जिथे एका प्रेमविवाहित जोडप्याच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आणि त्यानंतर जे घडलं, ते एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. तीन वर्षांपूर्वी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्यात दुरावा आला आणि नवऱ्याने स्वतःच आपल्या पत्नीचा हात तिच्या प्रियकराच्या हातात सोपवला.
मुजफ्फरपूर जिल्ह्यातील बेरुआ गावची खुशी कुमारी आणि दरभंगा येथील राजू कुमार यांनी 2021 मध्ये मोठ्या थाटामाटात प्रेमविवाह केला होता. 2022 मध्ये त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म घेतला. सर्व काही सुरळीत सुरू असताना 2024 मध्ये खुशी पतीसोबत दिल्लीला गेली. त्यानंतर तिच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली. दिल्लीत खुशीची भेट बेतियाच्या बुलेट कुमारसोबत झाली. पाहता पाहता त्यांची मैत्री फुलली. त्याचे रुपांतर हळूच प्रेमात झाले.
खुशी आणि बुलेट यांच्यातील प्रेमाची कुणकुण राजूला लागली नव्हती. काही दिवसांनंतर खुशी आपल्या पती आणि मुलासोबत बनौली येथे आपल्या गावी परतली. पण तिचं मन राजूमध्ये रमत नव्हतं. तिला प्रत्येक क्षणी बुलेट कुमारची आठवण येत होती. अखेरीस तिने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी घरी बोलावले. ते दोघे बेडरूममध्ये असताना खुशीच्या सासऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
या घटनेनंतर घरात सर्वजण हादरले. यानंतर खुशीच्या सासऱ्यांनी तात्काळ आपल्या मुलाला म्हणजे राजूला याबद्दल सांगितले आणि संपूर्ण गावात एकच चर्चा सुरू झाली. अनेक वडीलधाऱ्या माणसांनी खुशीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने स्पष्टपणे सांगितले की मला राजूसोबत राहायचे नाही. मला बुलेटसोबत संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे. अखेर खुशीच्या निर्णयापुढे तिचा पती राजूने हार मानली.
यानंतर त्याने आपल्या पत्नीचा विवाह तिचा प्रियकर असलेल्या बुलेट कुमारसोबत लावून देण्याचा निर्णय घेतला. खुशीने तिचा मुलगा सासू सासऱ्यांकडे सोपवला आणि ती नव्या पतीसोबत त्याच्या घरी रवाना झाली. पण या घटनेची परिसरात चर्चा होत आहे.