‘गरब्याच्या काळात 4.5 लाख हिंदू तरुणी…’; भाजप आमदाराच्या विधानाने राजकारण पेटलं
भाजपच्या आमदाराच्या विधानाने राजकारण पेटलं आहे. त्यांनी गैर हिंदूंना गरब्यात प्रवेश देऊ नये, ही मागणी केली. त्यांच्या मागणीने वादाला तोंड फुटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून गरब्यात हिंदू नसलेल्या प्रवेश दिला जाऊ नये, याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक भाजप आमदारांकडून ही मागणी केली जात आहे. मध्य प्रदेशातील भाजप आमदार उषा ठाकूर यांनीही हीच मागणी केली. त्याचवेळी त्यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. दरवर्षी गरब्यादरम्यान जवळपास साडेचार लाख हिंदू तरुणी या गैर-हिंदू तरुणांसोबत पळून जातात. या जोडप्यांच्या लग्नामुळे जवळपास 9 लाख बाळांचा जन्म होतो. त्यामुळे गरब्यात प्रवेश देण्याआधी ओळख पटवून घेतली पाहिजे, असे आमदार ठाकूर यांनी सांगितले.
उषा ठाकूर यांनी म्हटलं की, माझा मुद्दा महत्वाचा आहे. ही बाब धक्कादायक असून जवळपास साडेचार लाख हिंदू तरुणी या गैर-हिंदू तरुणांसोबत पळून जातात. त्यानंतर या सर्व तरुणी 9 लाख बाळांना जन्म देतात. यामुळे लोकसंख्येवर परिणाम होत आहे. याची अधिकृत आकडेवारी हाती आलेली नाही. भाजप आमदार उषा ठाकूर यांनी पुढे सांगितलं की, लोकसंख्येवर होणारा परिणाम पाहून सर्व हिंदू संघटनांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता मूर्ती पूजा न करणाऱ्यांना गरब्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे आयोजकांकडून कळवण्यात आलं आहे. त्यामुळे कपाळावर टिळा आणि जानवे घालून प्रवेश कऱणाऱ्या दुसऱ्या धर्माच्या तरुणांना रोखण्यात यश येईल. उषा ठाकूर यांनी पुढे म्हटलं की, ‘हे तरुण गरब्यात हिंदू तरुणींची दिशाभूल करण्यासाठी येतात. दुसऱ्या धर्माचे लोक हिंदू तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. कोणताही राष्ट्रभक्त या भयंकर गोष्टी घडू देणार नाही. आता गरब्यात गैर-हिंदूंना प्रवेश नाकारला पाहिजे’.
भाजप आमदाराने पुढे म्हटलं की, गरबा आणि शक्ती पूजेचा एकमेकांशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी गरबा भक्ती केंद्रित होता. आता यात अनेक बदल झाल्याचे दिसून येत आहे. आता कार्यक्रमात महागडे कपडे, दागिने आणि टॅटूचे प्रदर्शन केले जाते. खरंतर गरब्याचं मूळ धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप जपलं पाहिजे’. उषा ठाकूर यांच्यानंतर आता आमदार रामेश्वर शर्मा यांनीही गैर-हिंदूच्या गरबा प्रवेशावर आक्षेप घेतला आहे. रामेश्वर शर्मा म्हणाले, ‘मुस्लिम तरुण एकटेच का येतात? त्यांनी त्यांच्या बहीण आणि मुलींना देखील सोबत आणलं पाहिजे’. रामेश्वर शर्मा यांच्या वक्तव्यानं देखील नवा वाद सुरू झाला आहे. रामेश्वर शर्मा यांच्या विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केली.
