
छत्तीसगड-तेलंगनाच्या बॉर्डवर मोठी चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये गेल्या 30 तासांपासून थांबून थांबून चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने तीन बड्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही मोठी कारवाई करण्यात येत आहे.
छत्तीसगड- तेलंगाना सीमावर्ती भागात सुरू असलेल्या मोठ्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात कोब्रा बटालियनला यश आलं आहे. बिजापूर जिल्ह्यातील कार्रेगुट्टा डोंगराळ भागात ही चकमक सुरू आहे. यात नक्षल्यांच्या मोठ्या कॅडरचे तीन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे.
डीआरजी पोलीस, कोब्रा बटालियन आणि सीआरपीएफ अशा तीन तुकड्यांच्या माध्यमातून हे ऑपरेशन सुरू आहे. सीआरपीएफच्या काही तुकड्या अजूनही घटनास्थळी आहेत. गेल्या 30 तासांपासून थांबून थांबून ही चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने ड्रोनच्या माध्यमातून बॉम्बचा वर्षाव केल्याचीही माहिती समोर येत आहे.
दोन दिवसांपासून चकमक
गेल्या दोन दिवसांपासून छत्तीसगडच्या जंगलात ही चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने दोन दिवसापासून संपूर्ण जंगलाला वेढा टाकला आहे. डोंगरावरून चॉपरच्या सहाय्याने नक्षलवाद्यांवर गोळ्या घातल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे. याच रेंजमध्ये बिजापूरचा नम्बी, नाडपली डोंगराळ भागही येतो. पण सुरक्षा दलाने डोंगराला टार्गेट केलं आहे. डोंगरातच नक्षलवादी लपल्याने सुरक्षा दलाने नक्षल्यांची चांगलीच नाकाबंदी केली आहे.
गुट्टा डोंगरावर बडे कॅडर?
सुरक्षा दलाने गुट्टा डोंगरावर ड्रोन उडवलं आहे. याच डोंगरावर नक्षलवाद्यांचे मोठे कॅडर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या ठिकाणी हजारोंच्या संख्येने सुरक्ष दलाचे जवान तैनात असल्याचं सांगितलं जात आहे. ही चकमक कधीपर्यंत सुरू राहील याची काही माहिती मिळत नाहीये. पण छत्तीसगड – तेलंगनाच्या बॉर्डवरचं हे सर्वात मोठं ऑपरेशन असल्याचं सांगितलं जात आहे.
बिजापूरमध्येही चकमक
याशिवाय सकाळी बिजापूर येथेही पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. उसूर ठाणे क्षेत्रातील गलगम-नडपल्ली भागातील डोंगराळ प्रदेशातही चकमक झाली आहे. सातत्याने गोळ्या चालण्याचा आवाज येत आहे. एक आयडी ब्लास्ट झाल्याचीही माहिती मिळत आहे.