CJP : आम्ही ह्यूमन बॉम्ब, कुठेही…अभिजीत दीपकेच्या विश्वासू मित्राचं खळबळजनक विधान; पुढच्या प्लॅनची हिंट देऊन टाकली!
सौरभ दास यांनी जेलमधील अनुभवांवर एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारवर मिश्किल टोला लगावत टीका केली आहे.नेमकं काय म्हटलं?

गेल्या काही महिन्यांमध्ये देशात सीजेपीचं वादळ उठलं आहे. या वादळामध्ये एका केंद्रीय मंत्र्याचं तख्त नेस्तनाबूत झालं आहे. त्यामुळे सीजेपीचा मोठा धसका केंद्र सरकारने घेतला आहे. असं म्हणण्यामागे आणखी एक मोठं कारण आहे ते म्हणजे सीजेपीच्या कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यास केंद्र सरकार आता तयार नसून, दिल्लीमधील प्रसिद्ध जंतर मंतर मैदानाला आता आंदोलन स्थळातून वगळून टाकण्यासारखा मोठा निर्णय घेण्याची तयारीही सरकारकडून करण्यात आली. काही दिवसांआधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीनं दिल्लीत आंदोलनाची हाक दिल्यानंतर संपूर्ण दिल्लीला पोलिसांकडून छावणीचं स्वरुप देण्यात आल्याचं अख्ख्या देशानं पाहिलं. अनेक रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन्सचे तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आल्या.
यानंतर अभिजित दिपके यांच्यासह सीजेपीच्या मुख्य प्रवक्त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर तिरंगा रॅली सुरु होण्याआधीच दिपकेंनाही अटक करण्यात आली. दरम्यान. सौरभ दास यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर आता एका मुलाखतीत जेलमधील अनुभवांवर भाष्य केलं. आठवडाभर तिहारमध्ये घालवल्यानंतर त्यांनी सांगितलं की, जेलमध्ये मी संपूर्ण आनंद घेतला. एकांतवास मिळाला. पण बाहेर येताना लक्ष्य निश्चित केलं होतं. ते म्हणजे ज्ञानेश कुमार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आपले पहिले लक्ष्य असून त्यांना हटवल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. त्यांच्या राजीनाम्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये सीजेपी माघार घेणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
सरकारसाठी आम्ही मानवी बॉम्बसारखे आहोत. आम्ही कुठेही स्फोट घडवू शकतो, असं सरकारला वाटतं, असा मिश्किल टोला त्यांनी सरकारला लगावला. सौरभ दास हे सीजेपीच्या सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असून ते सीजपी अध्यक्ष अभिजित दिपके यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात.
रेड माईकला दिलेल्या मुलाखतीत सौरभ यांनी सांगितलं की, आपण तिहार जेलमध्ये खूप मजा केली. तिथला एकांत मला प्रचंड आवडला, पण एवढं मला माहिती होतं की आतमध्ये ७ महिने किंवा ७ वर्ष राहावं लागणार नाही, त्यामुळे मी निश्चिंत होतो आणि तिथेही छान वातावरण आहे, ज्याचा मी संपूर्ण आनंद घेतला. एकवेळा एखादं पुस्तक लिहण्याचाही विचार आलेला.