
आग्रा इथं आणखी एका बेकायदेशीररित्या धर्मांतर करणाऱ्या टोळीचा खुलासा झाल्यानंतर आता गुप्तचर संस्था अधिक सक्रिय झाल्या आहेत. याआधी बेकायदेशीर धर्मांतर आणि परदेशी निधीसाठी दोषी आढललेल्या उमर गौतमने अलीगढमध्ये आपलं जाळं पसरवलं होतं. त्याला अटक झाल्यानंतर यादीत 2018 मध्ये धर्मांतर केलेल्या 33 महिलांची नावं होती. त्यापैकी तीन महिला अलीगढमधील होत्या. लोकांना नोकरीचं आमिष दाखवून तो धर्मांतर करायला भाग पाडत असे. त्याचवेळी जानेवारीपासून या जिल्ह्यातून 97 महिला बेपत्ता झाल्या आहेत, ज्यात 17 किशोरवयीन मुलं आहेत. अशा परिस्थितीत, गुप्तचर संस्था धर्मांतराच्या मुद्द्याचाही तपास करत आहेत.
धर्मांतराचा मुख्य आरोपी छांगुर बाबावरील कारवाईनंतर एजन्सींनी त्याचा जिल्ह्याशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला. परंतु असा कोणताही संबंध आढळला नाही. आता सहा राज्यांमध्ये आग्रा पोलिसांच्या कारवाईनंतर, अलिगढ जिल्ह्यातही पोलीस सक्रिय झाले आहेत. तिथेही धर्मांतराचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. तसंच अलीगढचं अशा आरोपींशी संबंध असल्याचं आढळून आलं आहे. आकडेवारी पाहता, जानेवारीपासून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे परिसरातून एकूण 97 महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी बहुतेकांवर आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप आहे. त्यांचे नातेवाईकही त्यांचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत, त्यापैकी कोणी धर्मांतराला बळी पडलंय का, हे शोधण्यासाठी पोलिसांनी नव्याने शोध सुरू केला आहे.
उमर गौतमचं नाव अलिगडशी जोडलं गेलं होतं. तो गरीब वस्त्यांमध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधत होता. यासाठी त्याने एक संपूर्ण टीम तयार केली होती. तिथे तो धार्मिक पुस्तकं वाटायचा. धर्मांतर केलेल्या महिलांना उमरने ‘शायनिंग स्टार्स’ असं नाव दिलं होतं. याशिवाय उमरच्या भाषणाचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. नंतर तो काढून टाकण्यात आला. त्यात तो इस्लामचं महत्त्व अधोरेखित करताना दिसला. त्याने त्याचं नाव श्याम प्रताप गौतम वरून मोहम्मद उमर असं बदललं होतं.
याशिवाय लखनऊ बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात एटीएस न्यायालयाने दोषी ठरवलेला कलीम सिद्दीकीदेखील त्याच्या ओळखीच्या लोकांना भेटण्यासाठी अलीगढला येत असे. दोन वर्षांपूर्वी गाझियाबादमध्येही धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. मुख्य आरोपी अब्दुल्लाबद्दल माहिती मिळाली होती की त्याने त्याचं नाव सौरभवरून अब्दुल्ला असं केलं होतं.
जेव्हा जेव्हा धर्मांतराशी संबंधित टोळी पकडली गेली, तेव्हा त्यांचा अलिगढशी संबंध निश्चितच समोर आला होता. त्यामुळे आग्रा इथल्या कारवाईनंतर स्थानिक एटीएसनेही माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु आतापर्यंत कोणतीही संशयास्पद गोष्ट समोर आलेली नाही.