
फ्रान्सची एअरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडने भारतात फाल्कन 2000 एलएक्सएस एग्जीक्यूटिव्ह जेटची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या जेटची निर्मिती नागपुरात होणार आहे. जागतिक बाजारासाठी सुद्धा या ठिकाणी जेट निर्माण करण्यात येणार आहे. 2028 पर्यंत पहिले जेट तयार होणार आहे. डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्सच्या करारानंतर अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, ब्राझीलनंतर भारत पुढील पिढीतील व्यावसायिक जेट बनवणाऱ्या देशांच्या यादीत आला आहे. या करारामुळे नागपूरमधील डसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेडचा प्लॅट 400,000 वर्ग फूटाने वाढवण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 1,000 कोटींची गुंतवणूक नागपुरात होणार आहे.
फाल्कन 2000 जेटसची निर्मिती नागपुरात होणार आहे. त्यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात ऐतिहासिक करार झाला आहे. फाल्कन 2000 जेटसची निर्मिती प्रथमच फ्रान्सच्या बाहेर होत आहे. नागपूरमधील मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी फाल्कन 2000 ची पूर्ण निर्मिती नागपुरात होणार आहे. तसेच फाल्कन 8 एक्स आणि 6 एक्सची असेम्ब्ली सुद्धा नागपुरात होईल. पहिले मेड इन इंडिया फाल्कन 2028 पर्यंत नागपुरात तयार होणार आहे.
डसॉल्ट एव्हिएशनने म्हटले की, सन 2028 पर्यंत जेट बनून तयार होईल. डसॉल्ट एव्हिएशनने पॅरिस एअर शोमध्ये एक वक्तव्य दिले. त्यानुसार, कंपनी प्रथमच फ्रान्सबाहेर फाल्कन 2000 जेटची निर्मिती करणार आहे. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण भारत अमेरिका, फ्रान्स, कॅनाडा आणि ब्राझील या व्यावसायिक विमान निर्मिती देशांच्या पक्तींत जाऊन बसला आहे. भारत आणि फ्रान्समधील करार अशा वेळी झाला जेव्हा 787 ड्रिमलाइनर बनवणारी अमेरिकेची बोइंग विमानाच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त होत आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर या विमानांच्या सुरक्षेचे मुद्दा चर्चेत आला.
नागपूरमधील मिहानमध्ये डीआरएएल प्लँटमध्ये फाल्कन लाइनचे फ्यूजलेजचे भाग आणि कंपोनेंट तयार होत होते. आता हा प्लँट 4,00,000 वर्ग फूटचा करण्यात येणार आहे. या प्लँटची क्षमता दरवर्षी 22 एग्जीक्यूटिव्ह जेट बनवण्याची आहे. विमानांची संख्या जागतिक पातळीवर मिळालेली ऑर्डर आणि भारताची गरज यावर अवलंबून असणार आहे.