GK : जगातील विविध देशांच्या चलनाचं मूल्य कोण ठरवतं? कशी असते नेमकी प्रक्रिया?

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की एखाद्या देशाच्या चलनाचं मूल्य हे जास्त, एखाद्या देशाच्या चलनाचं मूल्य हे कमी हे नेमकं कोण ठरवतं? त्याची प्रक्रिया काय असते? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

GK : जगातील विविध देशांच्या चलनाचं मूल्य कोण ठरवतं? कशी असते नेमकी प्रक्रिया?
money
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 23, 2026 | 8:28 PM

जेव्हा डॉलरचं मूल्य वाढतं, तेव्हा रुपयाचं मूल्य कमी होतं, तेव्हा तुम्हाला सर्वात आधी हाच प्रश्न पडत असेल की, जगातील सर्व देशांच्या चलनाचं मूल्य अखेर कोण ठरवत असेल? कोणत्या देशाच्या चलनाचं मूल्य किती ठेवायचं, यावर कोणाचं नियंत्रण असेल? कोणत्याही देशामधील सरकार तेथील चलनाबाबत काही निर्णय घेऊ शकतं का? की हा सर्व खेळ जागतिक बाजारावर अवलंबून आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडलेच असतील, त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या स्थितीमध्ये डॉलर, युरो सारखे चलन हे भारतीय रुपयाच्या तुलनेत खूप मजबूत आहेत. तर दुसरीकडे मात्र श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ सारख्या देशाचं चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत कमजोर आहे, आज आपण ही संपूर्ण सायकल कशी चालते हे सोप्या शब्दात समजून घेणार आहोत.

चलनाचं मूल्य कसं ठरतं?

कोणत्याही देशाच्या चलनाचं मूल्य हे बाजारपेठेमधील चलनाची मागणी आणि पुरवठा यावर ठरतं. जेव्हा एखाद्या चलनाची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढते, तेव्हा आपोआपच त्या चलनाचं मूल्य देखील वाढतं. मात्र जेव्हा त्या चलनाची मागणी घटते तेव्हा आपोआप त्या चलनाचं मूल्य कमी होतं. विविध देशांसोबतचा व्यापार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैशांचे व्यवहार आणि सातत्याने वाढत जाणारी चलनाची मागणी या सर्व घटकांवर तुमच्या देशाच्या चलनाचं मू्ल्य किती असणार हे ठरतं.

समजा एखादा देश खूप जास्त निर्यात करत असेल तर परकीय कंपन्यांना त्या देशातील चलनाची जास्त गरज लागते, त्यामुळे आपोआपच चलनाच्या मागणीमध्ये वाढ होऊन, चलनाची किंमत वधारते. मात्र जेव्हा चलनाची मागणी घटते तेव्हा चलनाची किंमत देखील कमी होते. जेव्हा एखादा देश जास्त निर्यात न करता जास्त आयात करतो, तेव्हा त्या देशाला परकीय चलनाची जास्त गरज लागते, अशा स्थितीमध्ये चलनाची किंमत ही कमी होते.

अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?

तुमच्या चलनाची जागतिक बाजारात किंमत किती आहे, त्यावर तुमच्या अर्थव्यवस्थेचं भवितव्य अवलंबून असतं, ज्या देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत असते, जीडीपी चांगला असतो, त्या देशावर जगातील इतर देश व्यापारासंदर्भात अधिक विश्वास दाखवतात, तसेच अशा देशांसोबत व्यापाराची संधी मिळावी यासाठी देखील प्रयत्न करतात.