लाडक्या बहिणींना लॉटरी! सरकार देणार सोन्याचे नाणे, 2026-27 च्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद

लाडक्या बहि‍णींना दिलेले वचन सरकार पाळणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. महिलांना एक सोन्याचे नाणे देण्याची मोठी घोषणा सरकारने केली आहे. 8 ग्रॅम वजनी सोन्याचे नाणे सरकार देणार आहे. सोबतच सिल्क साडी योजनाही राबवणार आहे. आर्थिक संकटातून राज्य बाहेर येण्यासाठी सरकारने काही कठोर निर्णय सु्द्धा घेतले आहे.

लाडक्या बहिणींना लॉटरी! सरकार देणार सोन्याचे नाणे, 2026-27 च्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद
तामिळनाडू, थलपती विजय
| Updated on: Aug 05, 2026 | 12:15 PM

Tamilnadu Gold Coin Scheme : तामिळनाडूमधील जोसेफ विजय सरकारने अर्थसंकल्प 2026-27 मध्ये लाडक्या बहि‍णींसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. अर्थसंकल्पात ‘ब्रदर्स गिफ्ट स्कीम’ अंतर्गत राज्यातील महिलांना 8 ग्रॅमचे सोन्याचे नाणे आणि सिल्क साडी योजनेतंर्गत सिल्क साडी देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने 812 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला आहे. मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत निवडणूक जाहिरनाम्यात लग्न प्रसंगी महिलांना सरकारकडून गिफ्ट देण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्यासाठी त्यांनी आता बजेटमध्ये तरतूद केली आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर

तामिनळाडूचे अर्थमंत्री एन. मॅरी विल्सन यांनी विधानसभेत बजेट सादर केले. त्यांनी महिला, तरुण, विद्यार्थी, खेळ आणि कौशल्य विकास कामासाठी प्राथिमकता दिली. या अर्थसंकल्पात सर्वात चर्चेत असलेली घोषणा ‘अन्नन सीर थिट्टम’ ही आहे. या योजनेत नववधूंना 8 ग्रॅमचे सोन्याचे नाणे, सिल्क साडी देण्यात येणार आहे. त्यासाठी 812 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय लॅपटॉप भेट योजना, एआय प्रशिक्षण, नवीन आयटीआय, वसतिगृह निर्माण योजना, हज यात्रेसाठी सबसिडीत वाढ, ऑलम्पिकमध्ये सरस कामगिरीसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र यासारख्या योजनांचा समावेश आहे.

नववधूला मिळणार सोन्याचे नाणे

TVK सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात ‘अन्नन सीर थिट्टम’ म्हणजे भावाकडून भेट योजनेची घोषणा केली होती. त्यांतर्गत एक सॉव्हेरन म्हणजे 8 ग्रॅमचे सोन्याचे नाणे आणि एक रेशम साडी देण्यात येणार आहे. या महत्त्वकांक्षी योजनेसाठी विजय सरकारने बजेटमध्ये 812 कोटींची तरतूद केली आहे. या योजनेचा राज्यातील हजारो गरीब कुटुंबांना लाभ होईल. मुलीच्या लग्नातील एक खर्च कमी होईल.

राज्यातील आर्थिक परिस्थितीवर श्वेत पत्रिका

बजेट भाषणात सरकारने अगोदर श्वेत पुत्रिकेचा उल्लेख केला. या दाव्यानुसार, यापूर्वीच्या सरकारने आर्थिक धोरणात मोठी अनियमितता ठेवली. सरकारच्या माहितीनुसार, तामिळनाडूवर एकूण थकीत कर्जाचा डोंगर 13.18 लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. या बजेटमध्ये महसूल घसरल्याचे आणि महसूलात तूट आल्याचे म्हटले आहे. अर्थमंत्री विल्सन यांनी मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे कौतुक केले. काही ठराविक पक्ष आणि नेत्यांच्या लोकांनाच निविदा प्रक्रियेत स्थान मिळत होते. ते बाजूला करण्याचे काम विजय यांनी केल्याचे ते म्हणाले. तर  विजय सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. हा चुकीचा पायंडा पडत असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयाविरोधात काही जण कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us