भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी मंगळवारी रात्री उशिरा मेदांता रुग्णालयात सोनम वांगचूक यांची भेट घेतली. सोनम वांगचूक यांना मंगळवारीच मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?
सोनम वांगचूक
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 22, 2026 | 10:10 AM

दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी संध्याकाळी गुरुग्राममधील मेदांता या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी रात्री उशिरा सोनम वांगचूक यांची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी डॉ. सुशीला कटारिया यांच्या देखरेखीखाली रुग्णालयाच्या आयसीयू 8 मध्ये दाखल असलेल्या सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र विद्यार्थ्यांचं जंतर-मंतरवर आंदोलन सुरू असताना नड्डा यांनी सोनम वांगचूक यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

वांगचूक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी मागणारी याचिका त्यांची पत्नी गीतांजली अंगमो यांनी सोमवारी दाखल केली होती. त्यावर मंगळवारी मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मेदांता रुग्णालयात वांगचूक यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञांचं पथक तयार करावं, असे निर्देशही न्यायालयाने दिले. कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यायचे हा राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 आणि 21 अंतर्गत वांगचूक यांचा मुलभूत अधिकार असल्याचं उच्च न्यायालयाने नमूद केलं.

कोर्टातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला कळवलं की सोनम वांगचूक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वांगचूक सतत वैद्यकीय देखरेखीखाली राहावेत आणि मेदांताच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज देऊ नये, असा आग्रह धरला.

दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवरील आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी पहिल्यांदाच मत प्रदर्शन केलं. आंदोलकांच्या वतीने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना सादर केलेल्या लेखी मागण्याबाबत केंद्र सरकाराने अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजीची भावना वाढत असून त्याचं प्रदर्शन जंतर-मंतरवर उमटत आहे. सोमवारी दुपारी पोलिसांनी जंतर-मंतर रिकामं केलं होतं. मात्र रात्री पुन्हा तिथे आंदोलक जमू लागले. गेल्या पाच दिवसांपासून वाढत गेलेला तरुण-तरुणांचा ओघ अद्यापही सुरूच आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us