Youtube वर व्हिडिओ पाहून घरातच पत्नीची डिलीवरी करत होता, पण तितक्यात गर्भनाळ आतमध्ये अडकली आणि मग..
शशिकलाचा नवरा कार्तिकने नॉर्मल डिलीवरीसाठी कुठल्या मेडिकल एक्सपर्टची मदत घेतली नाही. त्याने युट्यूबला गुरु बनवलं. कार्तिकने युट्यूबवर डिलीवरीशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले. स्वत:ला तो डॉक्टर समजत होता.

सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि Youtube वरुन बऱ्याच गोष्टींची माहिती जाणून घेतली जाते. एखादी माहिती किंवा पदार्थ असेल तर तो Youtube वरुन शिकल्यास हरकत नाही. पण युट्यूब पाहून कोण पत्नीची डिलीवरी करत असेल तर काय म्हणाल?. सोशल मीडिया आणि युट्यूब वर डोळेबंद ठेऊन विश्वास ठेवणं किती महाग पडू शकतं ते समोर आलय. तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. एक युवक आपल्या डॉक्टर बनण्याच्या इच्छेपोटी Youtube वर व्हिडिओ पाहून घरातच पत्नीची डिलीवरी करण्याचा प्रयत्न करत होता. हा नुसता बेजबाबदारपणा नाही, तर मूर्खपणामुळे एका चांगल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती आणि सासू विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
ही घटना तिरुप्पुर जिल्ह्याच्या उथुकुली येथील थलावैपलयम गावात घडली. या गावात राहणारी शशिकला नावाची महिला गर्भवती होती. शशिकलाला पहिलं मूल सिजेरियन डिलीवरी म्हणजे ऑपरेशनद्वारे झालं होतं. यावेळी शशिकला, तिचा पती कार्तिक आणि सासू सगळ्यांची इच्छा होती की, नॉर्मल डिलीवरीने बाळाचा जन्म व्हावा. म्हणून या कुटुंबाने डॉक्टर किंवा रुग्णालयात जाण्याऐवजी घरातच शशिकलाची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला.
त्याने युट्यूबला गुरु बनवलं
शशिकलाचा नवरा कार्तिकने नॉर्मल डिलीवरीसाठी कुठल्या मेडिकल एक्सपर्टची मदत घेतली नाही. त्याने युट्यूबला गुरु बनवलं. कार्तिकने युट्यूबवर डिलीवरीशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले. स्वत:ला तो डॉक्टर समजत होता. शशिकलाला प्रसूती वेदना सुरु झाल्या. त्यावेळी कार्तिक आणि त्याची आई म्हणजे शशिकलाच्या सासूने घराच्या आतच प्रस्तुची प्रक्रिया सुरु केली.
हळूहळू तिची शुद्ध हरपली
कुठल्याही वैद्यकीय उपकरणाविना आणि अनुभवाशिवाय प्रसुती करताना गडबड झाली. नॉर्मल डिलीवरीच्या नादात गर्भनाळ व्यवस्थितपणे वेगळी झाली नाही. गर्भनाळ आत अडकल्याने आणि चुकीच्या पद्धतीने खेचली गेल्याने शशिकलाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. काहीवेळात शशिकलची तब्यूत नाजूक बनली. हळूहळू तिची शुद्ध हरपू लागली.
दिलासा देणारी एकच बाब म्हणजे…
परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर कुटुंबीय तिला तातडीने पेरुनदुरई येथील सरकारी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे तिची गंभीर प्रकृती बघून डॉक्टरांनी तिला कोयंबटूरच्या खासगी रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले. पण अत्याधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने शशिकलाचे प्राण वाचवता आले नाहीत. रविवारी तिचा मृत्यू झाला. दिलासा देणारी एकच बाब म्हणजे डॉक्टरांनी नवजात अर्भकाचे प्राण वाचवले.