तीन कोटींची फसवणूक, आई-वडिलांना अटक अन् साईशाचं करिअरही थांबलं; ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीच्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?
'रंग माझा वेगळा' या मालिकेतील बालकलाकार साईशा भोईर हिच्या कुटुंबावर काही वर्षांपूर्वी मोठं आर्थिक आणि कायदेशीर संकट ओढावलं होतं. हे प्रकरण नेमकं काय होतं, ते जाणून घ्या..

मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली बालकलाकार साईशा भोईर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या साईशाच्या कुटुंबावर काही वर्षांपूर्वी मोठं आर्थिक आणि कायदेशीर संकट ओढवलं होतं. तिच्या आई-वडिलांवर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप झाले आणि या प्रकरणात तिच्या आईला अटकही झाली होती. या सगळ्याचा परिणाम साईशाच्या अभिनय कारकिर्दीवरही झाला. आता अनेक दिवसांनी साईशाची आई पूजा भोईर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आम्हाला न्याय मिळाला’, असं म्हणत त्यांनी केलेल्या या पोस्टमुळे जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.
नेमकं काय आहे साईशाच्या कुटुंबाचं प्रकरण?
साईशा भोईर ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय बालकलाकार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून तिला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. मात्र, 2023 मध्ये तिच्या आई पूजा भोईर यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप झाले. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचं आमिष दाखवून अनेकांकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
View this post on Instagram
मिळालेल्या वृत्तानुसार, पूजा भोईर या अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणुकीचा व्यवसाय करत असल्याचं सांगत होत्या. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. मात्र, नंतर पैसे परत मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. मुंबईतील एका दाम्पत्याने 16 लाख रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नाशिक, लातूर आणि इतर ठिकाणांहूनही तक्रारी समोर आल्याचं वृत्त आहे. एकूण फसवणुकीची रक्कम तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात पूजा भोईर यांना अटक करण्यात आली होती. त्यांचे पती विशांत भोईर यांच्याविरोधातही आरोप झाले होते.
आई-वडिलांवरील आरोपांचा साईशाच्या करिअरवर परिणाम
या संपूर्ण प्रकरणाचा परिणाम साईशाच्या अभिनय कारकिर्दीवरही झाला. त्यावेळी ती ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत काम करत होती. मात्र, कुटुंबातील परिस्थिती आणि आईच्या अटकेमुळे तिच्या कामावर परिणाम झाला. अखेर तिला मालिकेतून बाहेर पडावं लागल्याचं वृत्त समोर आलं होतं. काही काळ ती मनोरंजनविश्वापासून दूर होती. त्यामुळे लहान वयातच साईशाला मोठ्या कौटुंबिक संकटाचा सामना करावा लागला.
आता दिवाळीच्या निमित्ताने पूजा भोईर यांनी कुटुंबासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्यांनी लिहिलेली पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. ‘सगळं काही गमावलं? कदाचित! पण आम्ही पुन्हा एकदा सर्व काही मिळवलं. लोकांनी टीका केली, दोष दिले आणि स्वतःचे अंदाज बांधले. पण आम्ही शांत राहिलो, प्रार्थना करत राहिलो आणि आमच्या श्रद्धेवर ठाम राहिलो’, अशा आशयाचं त्यांनी म्हटलं आहे.
