आईला मार्गातून हटव,तरच मुलीला सासरी पाठवेन..मुलाने चक्क जन्मदात्या आईच्या जेवणात विष कालवले…
आईच्या जेवणात कुठला मुलगा विष कालवू शकतो का ? या कल्पनेने अनेकांच्या अंगावर काटा येईल. कारण एक अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

आई म्हणजे जन्मदात्री, जी मुलाच्या रक्षणासाठी स्वत:च्या जीवाची देखील पर्वा करीत नाही. आईसाठी मुले कितीही मोठी झाली तरी आयुष्यभर छोटीच असतात. ज्या आईने मुलाला नऊ महिने पोटात ठेवले. त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. त्याचे बोट पकडून चालायला शिकवले आणि आपल्या हाताने न्हाऊ माखू घातले आणि मोठे केले. तो मुलगाच पत्नीसाठी कृतघ्न निघाल्याची घटना घडली आहे. या मुलाने सासूच्या सांगण्यावरुन आईच्या ताटातच विष कालवल्याचा आरोप होत आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील धक्कादायक घटनेने घनघोर कलियुग कशाला म्हणतात याची प्रचिती आली आहे. येथील आग्र्याच्या पिनाहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरपुरा गावातील ही घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरनुसार ९ जुलै २०२६ च्या दुपारी तीन वाजताच्या दरम्यान रवींद्र याच्यावर त्याची आई राममूर्ती हिला विष दिल्याचा आरोप आहे.
छोलेमध्ये मिसळले विष
तक्रारदार आणि पीडीतेचे पती रणवीर सिंह यांचा आरोप आहे की मुलाने छोले ( काबुली चणे ) भाजीत विषारी पदार्थ मिसळून आईला खायला दिला. जेवल्यानंतर राममूर्ती यांची तब्येत ढासळली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, सध्या राममूर्ती यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आईला संपव, तरच बायको मिळेल…
या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे एफआयआरनुसार आरोप आहेत की रविंद्र याने त्याच्या वडीलांना सांगितले की विषारी पदार्थ त्याला त्याची सासून फुलवती यांनी दिला होता.
सासूने जावयाला गटपुरा गावांत बोलावून ही विषाची पुढी दिली होती आणि त्याला बजावले की जर तुझ्या आईला रस्त्यातून हटवले तरच तुला तुझ्या पत्नीला ( मुलगी ) तुझ्यासोबत सासरी पाटवेन.या एफआयआर मध्ये आईला संपवण्याचा कटात पत्नी आणि तिची आई ( सासू ) ला कटात नाव आले आहे.
जमिनीचा वाद आणि भावाचा मोठा आरोप
आरोपीचा भाऊ मुकेश याने सांगितले की कुटुंबात अलिकडेच खरेदी केलेल्या जमीनीवर वाद सुरु होता. त्यांनी आरोप केला आहे की रविंद्र याच्या पत्नीला ( मुलगी ) सासूने माहेरीच ठेवले होते. जर आईला विष देशील तरच मुलीला मी घरी पाठवेन असे सासूने रविंद्र याला बजावले होते. यानंतर छोलेमध्ये विष कालवून रविंद्र याने त्याच्या आईला खायला दिले.
या प्रकरणात पोलिसांनी रविंद्र आणि त्याची सासू फुलवती हिच्या विरोधात BNS चे कलम 61, 109 आणि 123 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाला अटक केली आहे.प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट, फोरेन्सिक तपास आणि अन्य साक्षी आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.